www.24taas.com, कार्ला, लोणावळा
लाखो भाविकांची कुलस्वामीनी असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या कार्ला येथील एकविरा देवस्थान ट्रस्टमधील वाद पेटलाय. या वादाचे रुपांतर शनिवारी हाणामारीत झालं. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवसेना नेते अनंत तरे आणि ट्रस्टचे उपाध्यतक्ष मदन भोई यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार मंदिराशेजारील भक्तीधाम परीसरामध्ये घडला. अध्यक्ष अनंत तरे हे मनमारी कारभार करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
गेल्या चार-पाच महिन्यांपासून एकविरा देवस्थानचा कारभार पाहणाऱ्या एकविरा देवस्थान ट्रस्टमध्ये अंतर्गत वाद पेटला होता. ट्रस्टचे माजी विश्वस्त मिलिंद बोजे आणि रेश्मा देवकर यांच्या निशाण्यावर ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आणि शिवसेना नेते अनंत तरे आहेत. संतप्त देवकर आणि बोजे समर्थकांनी विद्यमान ट्रस्ट बोगस असल्याचा आरोप केला. शिवाय ट्रस्ट बरखास्तीच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी रास्तारोकोही केला. हा संघर्ष वाढत असताना शनिवारी देवस्थान ट्रस्टची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ही बैठक घेण्यास बोजे, देवकर समर्थक गावकऱ्यांनी विरोध केला. दोन्ही गटातला वाद चिघळला आणि त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं. यावेळी तरे यांना धक्काबुक्की तर उपाध्यक्ष मदन भोई यांना मारहाण करण्यात आली. आपल्याला ठार मारण्याच्या उद्देशानं हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप तरे यांनी यावेळी केला.
दुसरीकडे, विद्यमान ट्रस्ट बोगस असल्याचा पुनरुच्चार करत तरे यांनी महिलांना धक्काबुक्की केल्यानं वाद चिघळल्याचा आरोप होतोय. हा वाद आता स्थानिक विरुद्ध इतर असा रंगत चाललाय. त्याला शिवसेना विरुद्ध राष्ट्ररवादी अशीही झालर चढू लागलीय. देवस्थान ट्रस्टमध्ये झालेल्या वादावादीतून दोन्हीही गटांनी एकमेंकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करून एकमेकांच्या अटकेची मागणी केलीय.