www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापूर टोल प्रश्न आता चांगलाच चिघळलाय. टोलविरोधी आंदोलनाला आता हिंसक वळण लागलंय. कोल्हापुरातील फुलेवाडी आणि शिरोली टोलनाक्यांची आज शिवसैनिकांनी आणि संतप्त नागरिकांनी तोडफोड केलीय. टोल नाके पेटवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केलाय.
टोल विरोधात उद्या शिवसेनेनं कोल्हापूर बंदची हाकही दिलीय. आज आमदार राजेश क्षीरसागर आणि चंद्रदीप नरकेंनी रस्ता रोको आंदोलनही सुरु केलंय. कोल्हापुरात सुरु असलेले टोल नाके शनिवारी मध्यरात्रीपासून बंद होतील असं आश्वासन कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिल्यानंतर टोल विरोधी कृती समीतीच्या सदस्यांनी आमरण उपोषण मागं घेतलं.
पण यानंतर सुद्धा आज कोल्हापुरातील अनेक टोल नाक्यावर आय.आर.बी कंपनीनं टोलवसुली सुरूच ठेवली. यामुळं संतप्त झालेल्या कोल्हापूरकरांनी टोलनाक्यांना आपलं लक्ष्य करत टोलनाक्यांची तोडफोड केली. फुलेवाडी पाठोपाठ शिरोळी टोलनाक्यावरही तोडफोड करत आपला रोष व्यक्त केला.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे महापौर आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकही शिरोली टोल नाक्यावर आले. कोल्हापुरच्या महापौर सुनिता राऊत यांनी आजचं आंदोलन चिघळायला आय.आर.बी कंपनी जबाबदार असल्याचं म्हटलंय. कोल्हापूर महानगरपालीका आय.आर.बीचा खर्च देण्यासाठी तयार असताना टोल वसुलीची घाई का झाली असा प्रश्न त्यांनी उपस्थीत करुन आय.आर.बी कंपनीला कोल्हापूरी भाषेत सज्जड दम दिलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.