बिहारी कामगारांना मराठी कामगारांकडून बेदम मारहाण

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एका कारखान्यात मराठी कामगारांनी बिहारी कामगारांवर लाठ्या, काठ्यांनी तसंच हॉकी स्टिक्सनी हल्ला केला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 10, 2013, 04:31 PM IST

www.24taas.com, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एका कारखान्यात मराठी कामगारांनी बिहारी कामगारांवर लाठ्या, काठ्यांनी तसंच हॉकी स्टिक्सनी हल्ला केला. यामध्ये अनेक कामगार जखमी झाले असून त्यांना जयसिंगपूरच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. तर सुमारे ५० बिहारी कामगार तेथून पळून गेले आहेत.
शिरोळ येथील इचर कॉलनीमधील चंदेश्वरी सहकारी सूत गिरणी लिमिटेडमध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी दीडशे कामगारांची भर्ती करण्यात आली होती. या गोष्टीबद्दल मराठी कामगारांमध्ये नाराजी होती. मराठी कामगार आणि बिहारी कामगार यांच्यात वारंवार वाद होत होते. मात्र कंपनीचे एमडी अकोले साहेब यांना मात्र काम बिहारी कामगारांकडूनच करून हवं होतं. याद्वारे त्यांना मराठी कामगारांची कारखान्यात चालणारी मनमानी कमी करायची होती.

मात्र, या सगळ्या राजकारणात मंगळवारी मराठी कामगारांनी बिहारी कामगारांवर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्य़ा बिहारी कामगारांचे नातेवाइक जिल्हाधिकारी संजय कुमार सिंग यांच्याकडे गेले आहेत.