NCERTला महाराष्ट्रातल्या संत परंपरेचा विसर

महाराष्ट्रावर अन्याय... समाजकारण असो किंवा राजकारण प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राशी दुजाभाव होत असल्याची भावना साऱ्यांकडून व्यक्त होतच असते. हीच बाब एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातही पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 23, 2013, 12:20 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, पुणे
महाराष्ट्रावर अन्याय... समाजकारण असो किंवा राजकारण प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राशी दुजाभाव होत असल्याची भावना साऱ्यांकडून व्यक्त होतच असते. हीच बाब एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातही पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलीय. संतांची शिकवण साऱ्या समाजाला आदर्शवत आणि मार्गदर्शक असते. मात्र एनसीईआरटीला याचा बहुदा विसर पडलाय. त्यामुळंच की काय केंद्रीय शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमध्ये महाराष्ट्रातील संताच्या कार्याचा कसलाही उल्लेख केलेला नाही. ज्या नामदेवांनी संत परंपरा उत्तरेपर्यंत पोहचवली त्याचा साधा उल्लेखही अभ्यासक्रमात करण्यात आलेला नाही.
एकीकडे काही भागतील त्या त्या परिसरातच प्रसिद्ध असणाऱ्या संतांचा सहभाग अभ्यासक्रमात करण्यात आलाय. केंद्रीय शालेय अभ्यास इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचं कर्तृत्व तीन ओळीत आणि मराठ्यांचा इतिहास दीड पानात संपवणाऱ्या एनसीईआरटीला महाराष्ट्राच्या संतांचाही विसर पडल्यानं संताप व्यक्त होतोय.

मुळात अभ्यासक्रम ठरवणाऱ्या संचालक मंडळावर महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीचा समावेश नाही. त्यामुळं एनसीईआरटीच्या संचालक मंडळावर महाराष्ट्रातील विचारवंत असावा अशी मागणी जोर धरतेय.
अवघ्या समाजाला एकत्र राहण्याची शिकवण महाराष्ट्रातील संतांनी दिली. सामाजिक सहिष्णूता, सामाजिक बांधिलकी अशा सद्गुणांची शिकवण देणाऱ्या संतांच्या कार्याचा विसर एनसीईआरटीला पडावा याहून मोठी शोकांतिका ती कोणती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.