www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेच्या महासभेत आज आयआरबी विरोधात ठराव मंजूर करण्यात आला. कारण तूर्तास आयआरबीला पैसे न देण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत आज मंजूर करण्यात आला.
आयआरबीने ४९ किलोमीटर रस्त्याचा खर्च १ हजार कोटी रूपये असल्याचं सांगितलंय, पण प्रत्यक्षात एवढा खर्च कसा येऊ शकतो, असा सवाल उपस्थित होत आहे.
यावरून आयआरबीने तज्ञांची समिती नेमून विकास प्रकल्पाचं आधी पुर्नमूल्यांकन करावं, तसेच हे मूल्यांकन पारदर्शी होण्यासाठी यात टोलविरोधी कृती समितीच्या सदस्यांसह नगरसेवकांचाही समावेश असावा, असंही महापालिका ठरावात नमूद करण्यात आलं आहे.
कोल्हापूरातील रस्ते विकासाचं काम कराराप्रमाणे न झाल्याने कोल्हापूर टोलमूक्त करा, अशी मागणी महासभेत ठरावाच्या माध्यमातून करण्यात आली.
कोल्हापूरच्या जनतेने टोल वसुलीला कडाडून विरोध केला आहे. कोल्हापुरात मागील काही दिवसांपासून टोल वसुलीविरोधात धुमशान सुरू होतं. टोलविरोधात सर्वपक्ष एकत्र असल्याचं यावेळी दिसून आलं.
टोलवसुली तूर्तास होणार नाही, असं सांगूनही टोल वसुली झाल्याने, आंदोलकांनी टोल नाक्यांची मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली आहे. यापूर्वी आंदोलकांनी टोलविरोधात उपोषणही केलं होतं.
आयआरबीला कोल्हापुरातील जवळजवळ ४९ किलोमीटर रस्ते बांधण्यासाठी १ हजार कोटी रूपयांचा खर्च आला, असं आयआरबीने कोल्हापूर महापालिकेला कळवलं होतं. मात्र २२० कोटींचा रस्त्याचा प्रकल्प १ हजार कोटी रूपयांचा कसा होऊ शकतो, अशी चर्चा कोल्हापूरकरांमध्ये आहे.
कोल्हापूर महापालिकेचं बजेट मुळात २५० कोटी रूपयांचं आहे. नगरसेवक विकासनिधीही सध्या देणं होत नाही, तर आयआरबीला पैसे कसे देणार हा प्रश्न आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.