पुण्यात ढोल- ताशांच्या नाद कमी घुमणार!

पुण्यातल्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक देशविदेशातल्या नागरिकांसाठी आकर्षण असते. आणि ढोल ताशांची पथकं ही या मिरवणुकीची शान असतात. यावर्षी मात्र ढोल-ताशांच्या पथकांचा आवाज कमी होणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 18, 2013, 09:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातल्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक देशविदेशातल्या नागरिकांसाठी आकर्षण असते. आणि ढोल ताशांची पथकं ही या मिरवणुकीची शान असतात. यावर्षी मात्र ढोल-ताशांच्या पथकांचा आवाज कमी होणार आहे.
या ढोलताशांच्या गजराशिवाय पुण्यातला गणेशोत्सव पूर्णच होत नाही. यावर्षी मात्र ढोलपथकांच्या उत्साहावर काहीसं विरजण पडण्याची शक्यता आहे. कारण ढोल-ताशांच्या पथकातल्या सदस्यांची संख्या कमी होणार आहे. सध्या एका पथकात साधारण शंभर सदस्य असतात. यावर्षीपासून मात्र ही संख्या २५ करावी, असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ढोल वाजवताना हात आखडता घ्यावा लागणार आहे, त्याचं कारण म्हणजे ध्वनी पातळी.... पारंपारिक वाद्य असलेल्या ढोल ताशांच्या आवाजानंही ध्वनी पातळीचं उल्लंघन होऊ शकतं, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

ढोल पथकांमुळे मिरवणूक लांबते, मिरवणूक रेंगाळते आणि पर्यायानं मिरवणूक संपायला उशीर होतो. त्यातच दहशतवादी हल्ल्याची टांगती तलवार आहे, त्यामुळे मिरवणूक लवकर संपायला हवी, अशी कारणं पोलिसांनी ढोल पथकांवर निर्बंध आणताना दिली आहेत. ढोल पथकांवर बंदी येण्यापेक्षा निर्बंध मान्य करणं ढोल पथकांना योग्य वाटतंय.
ढोलपथकं ही पुण्याच्या गणेशोत्सवाचं आकर्षण.... ढोल पथकांमध्ये सहभागी होण्याचा मोह मराठी स्टार्सनाही होतो. यावर्षी मात्र पोलिसांच्या या नव्या नियमांमुळे ढोलताशांचा आवाज नेहमीसारखा घुमणार नाही, अशी चिन्हं आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.