‘सामना’मधून गडकरींवर जबरी टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीवरून शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनामधून नितीन गडकरींवर टीका केलीय...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 5, 2014, 05:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीवरून शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनामधून नितीन गडकरींवर टीका केलीय... नितीन गडकरी यांचं कसब असं की, त्यांनी मनसे प्रमुखांच्या हातावर दक्षिणा न ठेवता पाठिंबा मिळविण्याचा प्रस्ताव ठेवलाय... आणि कुठलाही टोल न देता न घेता मनसे प्रमुखांनी त्यास होकार दिल्याची बातमी फुटलीय...
जगाच्या राजकारणात इतका स्वस्त आणि मस्त सौदा आत्तापर्यंत झाला नसेल आणि त्याबद्दल गडकरी यांच्या व्यापारी कौशल्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच. जणू तागडीही त्यांची, मालही त्यांचा आणि गल्लाही त्यांचाच... महाराष्ट्रात स्वबळाची भाषा करणारे, स्वबळावर सत्ता आणू पाहणारे आता गडकरीकृपेनं लढणार नाहीत. हा त्यांचा सुटकेचा मार्ग आहे.
गडकरींमुळे अडलेल्या बाळंतिणीची सुटका होणार असेल तर त्यांचं कसब वाखाणण्यासारखं आहे. गडकरींनी मनसेप्रमुखांना सत्यनारायणास बोलावलं, पण प्रसाद मिळणार नाही असं बजावलं. प्रसाद वाटून झालाय. त्यामुळे सत्यनारायणाचे लांबूनच दर्शन घ्या. प्रसादाचं देणंघेणं नंतर पाहू असं गुप्तपणे सांगितलं. असा सत्यनारायण याआधी कधी झाला नसेल.
राजकारणातला हा चमत्कार आहे. महाराष्ट्राचे डोळे या चमत्कारानं दिपलेत. आम्ही तत्काळ दिल्ल्लीतल्या भाजप नेत्यांना विचारलं, काय हा चमत्कार? दिल्लीवाले म्हणाले, चमत्कार? आमचा या चमत्काराशी अजिबात संबंध नाही. त्यामुळे चमत्काराचा धूर दिसण्याआधीच विरुन गेला...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.