सिडनी : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत शनिवारी धक्कादायक निकालाची नोंद झाली. जर्मनीच्या अँजेलिक कार्बरने अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्सला पराभवाचा जोरदार धक्का देत ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद उंचावले.
अंतिम सामन्यात सेरेना विजयाची प्रबळ दावेदार मानली जात होती. मात्र अँजेलिनाने तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात सेरेनाला ६-४, ३-६, ६-४ असे तीन सेटमध्ये पराभूत करत पहिलेवहिले ग्रँडस्लॅम जिंकले.
पहिल्या सेटमध्ये अँजेलिकाने दमदार खेळ करत सेट आपल्या नावे केला आणि १-० अशी आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये सेरेनाने दमदार पुनरागमन करत बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दोघींमध्ये एका एका गुणांसाठी चुरस पाहायला मिळाली. कधी सेरेना पुढे तर कधी अँजेलिक पुढे असा खेळ सुरु होता. मात्र अखेर अँजेलिनाने बाजी मारली आणि तिसरा सेट जिंकला. या पराभवामुळे मात्र सेरेनाचे सातवे ऑस्ट्रेलियन आणि एकूण २२वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न मात्र भंगले.