नवी दिल्ली : एकेकाळी पीचवर प्रवेश केल्यानंतर हजारो टाळ्यांनी ज्याचं स्वागत व्हायचं त्याच क्रिकेटरवर सध्या ट्रक चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची वेळ आलीय.
एकेकाळी, न्यूझीलंड टीमचा माजी खेळाडू क्रिस केर्न्स ऑलराऊंडर म्हणून ओळखला जात होता. अनेक नजरा त्याच्यावर खिळून राहायच्या. परंतु, फिक्सिंगमध्ये नाव आल्यानंतर मात्र केर्न्सच्या आयुष्यानं वेगळंच वळण घेतलंय.
आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी केर्न्स सध्या बस स्टॉपच्या सफाईचं काम करतोय. मिळालेल्या माहितीनुसाक, केर्न्स ‘ऑकलंड सिटी काऊन्सिल’मध्ये नोकरी करतोय. इथं तो बस स्टॉपची सफाई करणारा ट्रक चालवतोय आणि बस स्टॉपची सफाईही करतोय. एकेकाळी लाखो-करोडोंमध्ये खेळणाऱ्या केर्न्सला या कामाचा मोबदला म्हणून एका तासाचे १७ डॉलर पगार मिळतोय.
फिक्सिंगच्या आरोपांतून बाहेर पडण्यासाठी केर्न्सची धडपड सुरुच आहे. या खटल्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मॅच फिक्सिंगमध्ये नाव आल्यानंतर केर्न्सनं आपली सारी कमाई न्यायालयीन प्रक्रियेत गमावलीय. घर चालवणं, मुलांचं पालनपोषण, बीलं भरणं, भाडं देणं आणि कोर्टात स्वत:ला निर्दोष सिद्ध करणं यासाठी त्याची केविलवाणी धडपड सुरू आहे.
केर्न्सचा मित्र डियोन नॅशनं न्यूझीलंड हेरॉल्डला ही माहिती दिलीय. केर्न्स आपल्या कुटुंबासाठी खूप मेहनत घेतोय. एक मित्र म्हणून त्याला अशा अवस्थेत जगताना पाहणं खूपच कठिण आहे. तो एक चॅम्पियन आहे आणि तो नक्कीच यातून बाहेर पडेल. मीही माझ्याकडून होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतोय, असं डियोननं म्हटलंय.
तिसऱ्या पत्नीसाठी खरेदी केली होती हिऱ्याची अंगठी
मॅच फिक्सिंगमध्ये नाव येण्यापूर्वी केर्न्सनं दुबईत डायमंड ट्रेडर म्हणूनही काम केलंय. इथंच त्यानं त्याची तिसरी पत्नी मेल क्रोजर हिला प्रपोज करण्यासाठी ३.२ कॅरेटच्या हिऱ्याची अंगठी खरेदी केली होती.
केर्न्सनं न्यूझीलंडसाठी ६२ टेस्टमध्ये ३३२० रन्स आणि २१८ विकेट दिलेत. तर २१५ वन डे मॅचमध्ये ४९५० रन्स आणि २०१ विकेट त्याच्या नावावर आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.