मेलबर्न : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सलामीच्या सामन्यात आज इंग्लंडवर १११ धावांनी दणदणीत विजय मिळविला. इंग्लंडसमोर ३४३ रन्सचे टार्गेट ऑस्ट्रेलियाने ठेवले होते. टार्गेटचा पाठलाग करताना इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकली.
अॅरोन फिंचच्या शतकानंतर मिशेल मार्शच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर पूर्ण वर्चस्व गाजवले. इंग्लंडचा डाव २३१ रन्समध्ये संपुष्टात आला. इंग्लंडचे सलामीवीर मोईन अली आणि गॅरी बॅलेंस प्रत्येकी १० रन्स काढून तंबूत परतले. इंग्लंडकडून जेम्स टेलरने एकाकी लढत दिली. त्याचे शतक फक्त दोन धावांनी हुकले. टेलर ९८ रन्सवर नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाने अॅरोन फिंचचे शानदार शतक (१३५), जॉर्ज बेली (५५) आणि ग्लेन मॅक्सवेलचे (६६) अर्धशतकाच्या जोरावर ३४२ रन्स केल्या. इंग्लंडचा स्टीव्हन फिनने भेदक गोलंदाजी करत ७१ रन्स देऊन पाच विकेट घेतल्या.
२०१५ क्रिकेट वर्ल्ड कपची सुरुवात स्टिव्हन फिनसाठी स्वप्नवत वाटावी अशीच झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फिननं हॅट्ट्रिक साधत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. फिननं ब्रॅड हॅडिन, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल जॉन्सनची सलग विकेट घेत हॅट्ट्किला गवसणी घातली. फिननं कांगारुंच्या इनिंगच्या शेवटी या सगळ्या विकेट्स घेतल्या. वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो सातवा बॉलर ठरलाय. तर इंग्लंडकडून २००९ नंतर हॅट्रटिक साधणार फिन पहिलाच क्रिकेटर ठरलाय.
तर दुसऱ्या सामन्यात यजमान न्यूझीलंडच्या टीमनं विजयी सलामी दिली. ब्रेंडन मॅककलमच्या टीमनं श्रीलंकन टीमला ९८ रन्सनं धुळ चारली. कोरी अँडरसनच्या झंझावाताच्या जोरावर किवी टीमनं हा विजय साकारला. न्यूझीलंडनं लंकन टीमसमोर ३३१ रन्सचं डोंगराएवढ लक्ष्य ठेवलं होतं. हे आव्हान पार करताना लंकेची टीम २३३ रन्सवरच ऑल आऊट झाली.
थिरीमन्ने आणि कॅप्टन ऍन्जेलो मॅथ्यूजनं एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे सारे प्रयत्न अपुरे पडले. किवींनीकडून त्यांच्या सा-याच बॉल्रसनी शानदार कामगिरी करत आपल्या टीमला विजय मिळवून दिला. टीम साऊदी, बोल्ट, मिल्ने, डॅनियल व्हिटोरी आणि कोरी अँडरसननं प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. ऑलराऊंडर कामगिरी करणारा कोरी अँडरसन मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. अँडरसननं ७५ रन्सची तुफानी इनिंग खेळली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.