बेल्जियमला हरवत 24 वर्षांनंतर अर्जेंटीनाची सेमीफायनलमध्ये धडक

Updated: Jul 6, 2014, 07:09 PM IST
बेल्जियमला हरवत 24 वर्षांनंतर अर्जेंटीनाची सेमीफायनलमध्ये धडक title=

 

नवी दिल्ली: क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटीनानँ बेल्जियमला 1-0नं पराभूत करत तब्बल 24 वर्षांनंतर सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. तर डार्क हॉर्स समजल्या जाणाऱ्या रेड डेविल्सचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. कॅप्टन लिओनेल मेसीची ही पहिलीच वर्ल्ड कप सेमी फायनल असणार आहे. 

 दिएगो मॅराडोनाच्या कॅप्टन्सीखाली 1990मध्ये सेमी फायनलमध्ये धडक मारल्यानंतर प्रथमच मेसीच्या कॅप्टन्सीखाली अर्जेंटीनानं सेमी फायलमध्ये प्रवेश केलाय. अर्जेंटीनाच्या या विजयाचा हिरो गोंझालो हिगुएन ठरला. लीग राऊंडमध्ये चांगली कामगिरी करता न आलेल्या गोंझालोनं क्वार्टर फायनलमध्ये आपला क्लास दाखवला. बेल्जियमविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये आठव्याच मिनिटाला गोल करत गोंझालोनं अर्जेंटीनाला क्विक स्टार्ट मिळवून दिला. 
एँजेल डि मारियाच्या पासवर शानदार गोल करत गोंझालोनं दमदार कमबॅक केलं. 

सुरुवातीलाच आघाडी मिळाल्यानं पहिल्यापासूनच अर्जेंटीनानं मॅचवर पकड मजबूत केली. 13व्या मिनिटाला अर्जेंटीनाला आपली आघाडी दुप्पट करण्याची संधी चालू आली होती. इजेकिल लावेजीनं गोल करण्याचा एक चांगला प्रयत्न केला. मात्र रेड डेविल्सच्या डिफेंसनं त्याचा हा प्रयत्न यशस्वी करु दिला नाही. मेसीला या वर्ल्ड कपमधील आपला पाचवा गोल झळकावता आला नाही. मात्र त्यानं रेड डेविल्सच्या डिफेंडर्सना चांगलंच बिझी ठेवलं. स्टॉपेज टाईममध्ये तिसऱ्या मिनिटाला मेसीला गोल करण्याची एक नामी संधी चालून आली होती. त्यानं एकट्यानंच बॉल खाली असलेल्या बेल्जियमच्या गोलपोस्टनजिक नेला. मात्र त्याचा गोलचा प्रयत्न कोर्टियोसनं हाणून पाडला. 

बेल्जियमलाही 26 आणि 42व्या मिनिटाला बरोबरी साधण्याच्या संधी चालून आल्या होत्या. मात्र, त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. गोंझालोला 55व्या मिनिटाला अजून एक गोल करण्याची संधी होती. मात्र त्याचा गोल गोलपोस्ट बारला आदळला. त्याने आक्रमक खेळ करत मेसीवरील भार हलका केला आणि अर्जेंटीनानं आम्ही वन मॅन आर्मी नसल्याचं या मॅचद्वारे दाखवून दिलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.