मुंबई : टीम इंडियाच्या नव्या कोचचा शोध सुरु झाला आहे... आता नवा कोच कोण असेल याचीच उत्सुकता क्रिकेट जगताला लागून राहिलीय.याच अनुषंगाने काही महत्त्वाच्या कोचेसचा आढावा घेणारी विशेष लेखमालिका 'कुणी घडवलं, कुणी बिघडवलं?'...
कपिल देव... भारताला पहिला-वहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे कॅप्टन... कपिल देव हे क्रिकेटपटू आणि कॅप्टन म्हणून जेवढे यशस्वी ठरले तेवढं यश त्यांना भारताचे कोच म्हणून काही मिळवता आलं नाही. मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे अखेर त्यांना एका वर्षातच कोच पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं.
1983 चा वर्ल्ड कप उंचावतानाचे कपिल देव यांची छबी कायमस्वरुपी देशवासियांच्या मनात ताजी राहतील. अखेर त्यांनी भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. ते एक यशस्वी कॅप्टन आणि क्रिकेटपटूही होते. यामुळे ते यशस्वी कोचही ठरतील अशी अपेक्षा ठेऊनच बीसीसीआयने त्यांच्याकडे 1999 मध्ये कोचपदावर नियुक्त केलं.
अंशुमन गायकवाड यांच्यानंतर के. श्रीकांत यांना डावलून बीसीसीआयने कपिल देव यांना कोचपद बहाल केलं. त्यावेळी सचिन तेंडुलकर टीम इंडियाची कॅप्टन्सी भूषवत होता. कपिल देव यांनी कोच पदाची सूत्र हाती घेतल्यावर लगेचच भारतात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये विजय मिळवून दिला. या सीरिजमध्ये सचिन तेंडुलकरची टेस्टमधील पहिली डबल सेंच्युरी झळकावली आणि सचिन-द्रविडने 331 रन्सची वर्ल्ड पार्टनरशिप केली. यामुळे कपिल देव यांचं कोच म्हणून कौतुक झालं.
मात्र यानंतर ऑस्ट्रेलिया दौ-यावर गेलेल्या भारतीय टीमला सपाटून मार खावा लागला. कांगारुंनी भारताला 0-3ने व्हाईट वॉश दिला. यानंतर दक्षिण आफ्रिका भारतीय दौ-यावर आली त्या सीरिजमध्येही भारताचा 0-2नं व्हाईट वॉश झाला. तब्बल 12 वर्षांनी मायदेशात भारताच्या पदरात पराभव पडला. या टेस्ट सीरिजनंतर सचिनने कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला.
यानंतर सौरव गांगुलीला वन-ने टीमचा कॅप्टन बनवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियाने 3-2ने विजय साकारला खरा मात्र, मॅच फिक्सिंग गालबोट या विजयाला लागलं. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन हॅन्सी क्रोनिए हा मॅच फिक्सिंग आणि बेटींगमध्ये अडकल्याचं दिल्ली पोलिसांकडून जाहीर करण्यात आल्यानं सारं क्रिकेटविश्वचं हादरलं. हॅन्सी क्रोनिएनेही आपण पैसे घेतल्याचं कबुल केलं. याच दरम्यान मनोज प्रभाकरनं कोच कपिल देव यांनी आपल्याकडे पैसे मागितल्याचा आरोप केला. कपिल देव यांना पाकिस्तानला मॅच जिंकून द्यायची होती, असा आरोप मनोज प्रभारकरनं केला.
या सा-या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द केलं. त्या चौकशीत कपिल देव दोषमुक्त ठरले. मात्र त्यांच्या यशस्वी करियरवर मॅच फिक्सिंगच्या आरोपाचा डाग लागला तो लागलाच. त्यावेळी बीबीसीच्या इंटरव्यूमध्ये टीव्हीवर रडणारे कपिल देव सा-यांनी पाहिले. राजकीय व्यक्ती, फॅन्सच्या दबावाखाली त्यांना अखेर भारतीय टीमच्या कोचपदाचा राजीनामा द्यावा लागला... आणि एक यशस्वी क्रिकेटपटू आणि कॅप्टन म्हणून करियर घडवलेल्या कपिल देव यांची अपयशी आणि वादग्रस्त कोच म्हणून नोंद झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.