स्टेलेनबोस्ट : 'ब्लेड रनर' म्हणून ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा अॅथलीट ऑस्कर पिस्टोरियस याला त्याच्या प्रेयसीच्या हत्या प्रकरणात कोर्टानं पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय. गेल्या वर्षी 14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे'च्या दिवशी पिस्टोरियसची प्रेयसी रीवा स्टीनकॅम्प हिची हत्या झाली होती.
न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर पिस्टोरिअसला सरळ जेलमध्ये धाडण्यात आलं. रिवा हिच्या हत्येप्रकरणात पिस्टोरिअस दोषी आढळलाय. रिवाची हत्या पूर्वनियोजित नव्हती, असा निर्वाळा याअगोदर न्यायालयानं दिला होता.
पिस्टोरिअसवर 2013 च्या व्हेलेंटाईन-डेच्या दिवशी आपल्या प्रेयसीची हत्या करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. पिस्टोरिअसनंच रीवावर बाथरुममध्ये गोळी झाडली होती. सरकारी वकीलनं पिस्टोरिअससाठी कमीत कमी 10 वर्षांच्या शिक्षेची मागणी केली होती. तर दुसरीकडे बचाव पक्षानं 'चुकून झाडलेल्या गोळीत आपल्या प्रेयसीला गमावलेला पिस्टोरिअस अगोदरपासूनच दु:ख भोगतोय' असं म्हटलं होतं.
'ब्लेड रनर' म्हणून प्रसिद्ध झालेला पिस्टोरिअस ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा पहिला अपंग व्यक्ती होता. त्यानं पॅरालम्पिक खेळांत 400 x 4 मिटर रिलेमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. पिस्टोरिअस एक वर्षांचा असतानाच त्याचे दोन्ही पाय गुडघ्याखाली निकामी झाले होते. तो कार्बन फायबर ब्लेडच्या साहाय्यानं धावत होता. गेल्या वर्षी टाईम मॅगझिनमध्ये जगभरतील सर्वात प्रभावी 100 व्यक्तींमध्ये एक नाव पिस्टोरिअसचंही होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.