नवी दिल्ली : भारताची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपदावर शिक्कामोर्तब करत यंदाच्या वर्षातील पहिल्या जेतेपद पटकावले.
मलेशिया बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या तिसऱ्या सीडेड सिंधूने स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिल्मोरला २१-१५, २१-९ असे दोन गेममध्ये सहज पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली. तिचे हे पाचवे ग्रां. पि जेतेपद आहे. तसेच २०१६ मधील पहिले जेतेपद आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच सिंधू जबरदस्त फॉर्ममध्ये होती. गेल्या वर्षी तिला विशेष अशी कामगिरी करता आली नाही. मात्र यंदाच्या वर्षाची सुरुवात तिने दणक्यात केलीय.
अंतिम सामन्यात पहिल्या गेममध्ये ती ५-२ अशी आघाडीवर होती. ही आघाडी तिने १०-६ पर्यंत वाढवली. गिल्मोरने सिंधूला चांगली लढत देण्याचा प्रयत्न करताना १८-१४ पर्यंत गुणसंख्या नेली. मात्र त्यानंतर सिंधूने तिला पुन्हा डोके वर काढण्याची संधीच दिली नाही आणि पहिला गेम २१-१५ असा आपल्या नावे केला.
दुसऱ्या गेममध्ये सर्वस्वी सिंधूने वर्चस्व गाजवले. ११-६ अशी घेतलेली आघाडी सिंधूने १९-७ अशी वाढवली. त्यानंतर गिल्मोरला अवघे दोन गुण मिळवता आले आणि सिंधूने जेतेपदावर कब्जा केला.