दानीश कनेरिया घेणार भारताचं नागरिकत्व ?

क्रिकेट खेळायला बंदी घालण्यात आलेला पाकिस्तानचा लेग स्पिनर दानीश कनेरिया आपल्या कुटुंबासोबत भारतामध्ये आला आहे.

Updated: Jun 1, 2016, 08:34 PM IST
दानीश कनेरिया घेणार भारताचं नागरिकत्व ? title=

मुंबई : क्रिकेट खेळायला बंदी घालण्यात आलेला पाकिस्तानचा लेग स्पिनर दानीश कनेरिया आपल्या कुटुंबासोबत भारतामध्ये आला आहे. कनेरिया त्याची बायको, मुलं आणि आईसोबत सध्या कोचीमध्ये असल्याचं बोललं जात आहे. 

कनेरिया हा भारतामध्ये नोकरीच्या शोधात तसंच भारतीय नागरिकत्व घेण्यासाठी आल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत. पण मी भारतात दहा दिवसांसाठी धार्मिक विधी करण्यासाठी आलो असल्याचं कनेरियानं स्पष्ट केलं आहे. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून मिळत असलेल्या वागणुकीबद्दल नाराज असलेल्या कनेरियानं याआधी गंभीर आरोप केले होते. मी जर हिंदू नसतो तर माझं प्रकरण बोर्डानं वेगळ्या पद्धतीनं हाताळलं असतं, असं कनेरिया म्हणाला होता. 

कनेरिया पाकिस्तानकडून 61 टेस्ट मॅच खेळला आहे. या मॅचमध्ये त्यानं एकूण 261 विकेट घेतल्या. काऊंटी क्रिकेटमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याच्या आरोपावरून कनेरियावर इंग्लंड क्रिकेट बोर्डानं 2012 मध्ये आजीवन बंदी घातली. 

दानीश कनेरिया हा पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला दुसरा क्रिकेटपटू आहे. याआधी अनिल दलपत हे पाकिस्तानकडून खेळलेले पहिले हिंदू खेळाडू होते.