www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून शिक्षणाचा बाजार कधीचाच सुरू झालाय. शिक्षणासारख्या उदात्त आणि पवित्र क्षेत्रात क्लासेसच्या मार्केटिंग मॅनेजर्सनी कधीचेच हातपाय पसरले आहेत. पण आता खुद्द कॉलेजांनीच आपापल्या आवारात कोचिंग क्लासेसची दुकाने थाटली आहेत. शिक्षणाच्या नावाखाली कॉलेजच्या कॅम्पसमध्येच उघडपणे धंदा सुरू झाला असून, करोडो रूपयांची मलई यानिमित्ताने कॉलेजवाल्यांनाही मिळत आहे...
कोचिंग क्लासेसचा उदय झाल्यापासून विद्यार्थी नव्हे तर परीक्षार्थी घडवले जात असल्याची ओरड शिक्षणतज्ज्ञांनी सुरू केलीय. त्यावर उपाय शोधण्याऐवजी आता खुद्द कॉलेजांनीच आपल्या कॅम्पसचे दरवाजे कोचिंग क्लासेससाठी सताड उघडे केलेत. धक्कादायक बाब म्हणजे त्यासाठी कॉलेज आणि कोचिंग क्लासेस यांच्यात चक्क टाय अप होऊ लागलीत. करोडो रूपयांचा नफा कमवणा-या या क्लासेसनी आता मुंबईतल्या प्रतिष्ठित कॉलेजांवरही मोहिनी घातलीय. मिळणा-या फीपैकी काही हिस्सा सरळसरळ या कॉलेजच्या मॅनेजमेंटला दिला जातो, असा आक्षेप घेतला जातोय. आता कॉलेज मॅनेजमेंटचीच अशी प्रायोरिटी बदलल्याने विद्यार्थी देखील क्लासेसनाच महत्त्व देऊ लागलेत. कॉलेजचे लेक्चर बंक करून ते केवळ क्लासेसमध्येच हजेरी लावतायत...
हे केवळ एका ठिकाणी होतेय, असे नाही. तर मुंबईतल्या जवळपास सगळ्याच कॉलेजांनी पैसे कमवण्याचा हा गोरखधंदा अवलंबला आहे. सायनमधल्या एस आय इ एस कॉलेजच्या भिंतीवर लावलेला हा बोर्ड पहा.. इथं कॉलेजने कोचिंग क्लास सोबत टाय अप केल्याचं बोर्डवर स्पष्ट दिसतंय. कॉलेजनेच क्लास चालवायला परवानगी देऊन, अकरावी आणि बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी कोचिंग क्लासच्या पदरात टाकलीय. धक्कादायक बाब म्हणजे या कोचिंग क्लासकडूनच विद्यार्थ्यांची अटेंडंस मागवली जातेय.
विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमधिल धडे शिकवण्याची परवानगी जर कॉलेजच देत असेल कॉलेजची गरज काय ? शिवाय आपण विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा केंद्रीत तयार करत असू तर त्याच्या सार्वंगीण विकासाची जबाबदारी कुणाची? असे प्रश्न आता पुढे येत आहेत.
झी मीडियाचे सवाल
महाविद्यालयांना कॅम्पसमध्ये कोचिंग क्लास चालवण्याची परवानगी दिली कोणी ?
अनुदानीत कॉलेजांनी शिक्षण विभागाची परवानगी घेतली होती का?
कोचिंग क्लास कॅम्पसमध्ये चालवण्याबाबत कोणताही नियम नाही.
कोचिंग क्लासची हजेरी कॉलेज कसं ग्राह्य धरतं?
12 बोर्ड परिक्षेसाठी 75 टक्के हजेरी बंधनकारक असताना विद्यार्थ्यांची कॉलेजमधली ही फेक हजेरी कशी काय ग्राह्य धरली जाते?
कॉलेज आणि कोचिंग क्लासच्या या काळ्या बाजारावर कुणाचच लक्ष नाही?
शिक्षण विभाग याची दखल घेणार का?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.