www.24taas.com, लंडन
लंडनहून न्यूयॉर्क किंवा दिल्लीहून लंडन हे अंतर केवळ एका तासात कापता येऊ शकते. अमेरिकन फौजांनी प्रशांत महासागरावर आज घेतलेल्या ‘जेट वेवरायडर’ या हायपरसोनिक वेगाच्या विमानाच्या चाचणीतून हे स्पष्ट झाले. या विमानाने थोडेथोडके नव्हे तर तब्बल ६९०० किलोमीटर अंतर फक्त एका तासात पार केले.
प्रवासी विमानातही ही यंत्रणा बसवली तर सध्याच्या जेट विमानांपेक्षाही ती भन्नाट वेगाने झेपावतील हे या चाचणीमुळे समोर आले. कॅलिफोर्नियातील एडवर्डस् वायुसैनिक विमानतळावरून अमेरिकन फौजांनी ‘बी-५२’ विमानाच्या सहाय्याने वेवरायडरचे परीक्षण घेतले. ५० हजार फूट उंचावर गेल्यावर ‘बी-५२’ने बंद इंजिनासह वेवरायडर सोडले.
तंत्रज्ञानानुसार इतक्या उंचीवरून पडताच त्याचे इंजिन आपोआप सुरू होणे अपेक्षित होते. सुदैवाने ते सुरू झाले आणि चाचणी यशस्वी झाली. वेवरायडर या विमानाची पहिली चाचणी जून २०११मध्ये घेण्यात आली होती, मात्र त्यावेळी ते आपले लक्ष्य पार करू शकले नव्हते.