एकदा चार्ज केल्यानंतर १०० किमी धावणार कार!

महिंद्रा ग्रुपच्या ‘महिंद्रा रेवा’नं सोमवारी आपली एक ‘न्यू जनरेशन इलेक्ट्रा’ कार ग्राहकांसमोर सादर केलीय. ‘महिंद्रा रेवा ई – टू ओ’ या इलेक्ट्रिक पॉवरवर चालणाऱ्या कारची किंमत आहे. ५.९६ लाख रुपये.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 19, 2013, 03:51 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
महिंद्रा ग्रुपच्या ‘महिंद्रा रेवा’नं सोमवारी आपली एक ‘न्यू जनरेशन इलेक्ट्रा’ कार ग्राहकांसमोर सादर केलीय. ‘महिंद्रा रेवा ई – टू ओ’ या इलेक्ट्रिक पॉवरवर चालणाऱ्या कारची किंमत आहे. ५.९६ लाख रुपये.
४८ व्होल्ट लिथिअम आयर्न बॅटरी असलेली ही कार एकदा चार्जिंग केल्यानंतर १०० किलोमीटरचा टप्पा गाठू शकते, असा दावा कंपनीनं केलाय. त्यामुळे शहरी भागात ही गाडी जास्त उपयुक्त ठरु शकते असं कंपनीला वाटतंय.
महिंद्रा अॅन्ड महिंद्राचे अध्यक्ष, पवन गोयंका यांच्या म्हणण्यानुसार, ‘पर्यावरणाच्या दृष्टीनं आज इलेक्ट्रिक पॉवरवर चालणाऱ्या गाड्यांना ग्राहक जास्त पसंती देत आहेत आणि त्यामुळेच कंपनीनं याच सेगमेन्टमध्ये पुढे पाऊल टाकण्याचं ठरवलंय ज्यामध्ये पर्यावरणाची काळजी प्रथम क्रमांकावर असेल. आमच्या या प्रयत्नांना ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद लाभेल तसंच सरकारी एजन्सिजचाही आम्हाला पाठिंबा मिळेल अशी आम्हाला आशा आहे.’
तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जिथं १५ एएमपी प्लग प्वॉईंट असेल तिथं कनेक्ट करा आणि ‘ई – टू ओ’ला चार्ज करा. यापुढेही जाऊन या गाड्या सौरऊर्जेवर चालवता येऊ शकतात.

बंगळुरूमध्ये नुकतंच या गाडीचं लॉन्चिंग पार पडलं. एका वर्षात ३०,००० गाड्यांची निर्मिती आणि ग्राहकांना पुरवठा करू शकतो, असं कंपनीनं म्हटलंय. जानेवारी महिन्यात भरलेल्या ‘ऑटो एक्पो’मध्ये ही गाडी पहिल्यांदा पाहायला मिळाली होती.