मुंबई : तुम्ही ऑफिसमधून आल्यावरही घरात तुमच्या मोबाईलवरच असता का? खासकरुन जेवतानाही तुम्ही तुमचा मोबाईल वापरत असाल तर त्याचे शरीरापेक्षाही तुमच्या कौटुंबिक संबंधांवर जास्त परिणाम होतात. यातील सर्वात वाईट बाब म्हणजे तुमच्या या सवयीमुळे तुमची मुलं तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
न्यू यॉर्क शहरातील काही शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञान आणि त्याचा व्यक्तींच्या कुटुंबांवर होणारा परिणाम यावर संशोधन केले आहे, त्यात ही माहिती समोर आली आहे. जे पालक जेवण घेताना किंवा ड्रायव्हिंग करताना मोबाईलचा वापर करतात, त्यांच्याविषयी त्यांच्याच मुलांच्या मनात नाराजीची भावना उत्पन्न होत असल्याचे या संशोधनात आढळून आले आहे.
भूतकाळातही रेडिओ, टेलिव्हिजन किंवा व्हिडिओ गेम्सच्या उत्क्रांतीच्या काळातही असे परिणाम त्या त्या पिढीतील व्यक्तींवर झाल्याचे आढळून आले आहे. पण, आता मात्र इंटरनेटच्या शोधानंतर त्याच्या होणाऱ्या अतिवापरामुळे कुटुंबातील व्यक्तींमधील आणि खास करुन पालक आणि मुलांमधील दरी मात्र दिवसेंदिवस वाढतच असल्याची भीती या संशोधकांनी व्यक्त केली आहे.
तंत्रज्ञानाच्या वाढत्या अवाजवी वापरामुळे आपल्या शेजारील व्यक्तींपेक्षा आपल्या फोनमध्ये काय घडते आहे याविषयी लोकांना जास्ती काळजी असल्याचे निरीक्षण या संशोधकांनी नोंदवले आहे. १०-१७ वयोगटातील २४९ पाल्य आणि त्यांचे पालक या जोड्यांवर हे संशोधन करण्यात आले आहे.
९२% मुलांना आपल्या पालकांनी त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच मुलांच्या परवानगीशिवाय त्यांच्याविषयी इंटरनेटवर काही अपलोड करणेही मुलांना पसंत नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. पालकांनी मुलांसाठी घालून दिलेले नियम पालकांनी पाळावे अशी मुलांची अपेक्षा असल्याचेही या संशोधकांनी सांगितले आहे.