www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
आदर्श घोटाळ्यातील कथित सहभागामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा गोत्यात आलेत.
आव्हाडांच्या आदर्शमधील फ्लॅटची चौकशी करा, असे आदेश ठाणे न्यायालयाने दिलेत. येत्या १७ जानेवारीपर्यंत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करा, असे आदेश न्यायालयाने दिलेत. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी याबाबतची याचिका दाखल केलीय. आव्हाड यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आदर्शमधील फ्लॅटची माहिती देण्यात आलेली नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आलाय.
दरम्यान, आदर्श घोटाळा प्रकरणी लोकलेखा समितीनं महाराष्ट्र सरकार आणि संरक्षण खात्यावर ठपका ठेवला आहे. महाराष्ट्र सरकार आणि संरक्षण खात्यातील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या गटाने कायदा-नियम धाब्यावर बसवून वीरपत्नी आणि सैनिकांच्या कल्याणासाठी राखून ठेवलेला आदर्शचा भूखंड लाटल्याचा ठपका समितीनं ठेवला असून तसा अहवाल लोकलेखा समितीचे अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी लोकसभेत हा अहवाल सादर केला. सीबीआयची चौकशी संथ गतीनं सुरू असल्याबद्दलची नाराजीही समितीनं व्यक्त केली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.