मुंबई : आपल्या देशातील ६० ते ७० टक्के जनता कुठे न कुठे शेतीवर अवलंबून आहे, मात्र शेती करणारा शेतकरी गुलामासारखा प्रत्येक दिवशी मरणयातना सहन करतोय. शेतकऱ्यांमधीलच कवि श्री कृष्ण कळंब यांनी या यातना व्हॉटस अॅपवर उतरवल्या आहेत.
या वर्षी मार्च महिन्यात पाऊस झाला, रिमझिम जलधारांचा आनंद मुंबईत एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या निनादने, एकविसाव्या मजल्यावरून टवीट केलं....
“Wow! Surprise rain in Mumbai… I’ am loving it”
घरी पोहोचला, गरमा गरम कांदा भजीचा आस्वाद घेतला, आणि आपल्या पसंतीचा पायजामा घालून झोपला.
याच वेळी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील एका छोट्या गावात दोन शेतकऱ्यांनी गळफास लावून आपलं जीवन संपवलं, त्यातील एक कांदा पिकवत होता, तर दुसरा कापूस पिकवत होता.
दोन्ही पिकं बेमोसमी पावसामुळे बरबाद झाली होती, जिवंत राहिले असते तर, सावकारी आणि बँकेच्या कर्जाने आपल्या पोराबाळांचे हाल ते डोळ्याने पाहू शकले नसते.
भूसंपादन विधेयकाला विरोध झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या व्यथा समोर येऊ लागल्या, पण आपण काहीही करू शकत नाहीत, मात्र शेतकऱ्यांसाठी काही करून दाखवण्याची जबाबदारी बळीराजाने घेतली आहे.
व्हॉटस अॅपवर बळीराजा नावाचा ग्रुप आहे, यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शेतीशी संबंधित व्यक्ती आहेत.
अनिलं बंदावले आपल्या किसान कॉल सेंटरच्या माहितीवरून समाधानी नव्हते. माहिती मिळत होती पण ती फक्त कागदी घोड्यासारखी, कारण कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला शेतीची संपूर्ण माहिती असतेच असं नाही. म्हणून त्यांनी फेसबुकवर शेतकऱ्यांचा एक ग्रुप तयार केला आणि व्हॉटस अॅप ग्रुप बनवला. यावर शेतकऱ्यांची फसवणूक नेमकी कुठे होत आहे, शेतकऱ्यांसाठी कोणती माहिती गरजेची आहे, हे लक्षात घेऊन यावर पोस्ट शेअर केल्या जातात.