कॅलिफोर्निया : फेसबुकवर अलिकडेच फोटोंऐवजी व्हिडिओज्, लिंक्स् तसेच साधे मजकुराचे पोस्टही अधिक प्रभावी ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. एखाद्या उत्पादनाची किंवा सेवेची फेसबुकद्वारे जाहिरात करण्यासाठी एकेकाळी फोटो हे एक लोकप्रिय माध्यम होते, मात्र ते समीकरण आता बदलत चाललंय.
एखाद्या ब्रॅण्डच्या उत्पादनासाठी पूर्वी फोटोंचा वापर मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत होता. अगदी एप्रिल २०१४ पर्यंत "फोटोज् आर स्टिल किंग ऑन फेसबुक अशी परिस्थिती होती. मात्र, आता परिस्थिती बदलली असून फोटोंऐवजी व्हिडिओ, लिंक्स तसेच साधा मजकुराला अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे, सोशल मिडियाद्वारे मार्केंटिंग तसेच त्याबाबतचा अभ्यास करणाऱ्या सोशलबेकर्स या कंपनीने सांगितले आहे.
'व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहचत असून ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना उत्पादनांच्या जाहिरातींसाठी व्हिडिओ तयार करण्याचा सल्ला देत आहोत' असे सोशलबेकर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जान रेझब यांनी सांगितले आहे.
या कंपनीकडे ४ हजार ४४५ ब्रॅण्डस्च्या सोशलमिडियाद्वारे प्रसाराचे काम आहे. या सर्व ब्रॅण्डस्च्या फेसबुक पेजवर ऑक्टोबर २०१४ ते फेब्रुवारी २०१५ दरम्यान या कंपनीने सहा लाख सत्तर हजार पोस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातून फोटोंऐवजी व्हिडिओ अधिक प्रभावी काम करत असल्याचे दिसून आले आहे. यामागे फेसबुकने अलिकडे बदललेले धोरण कारणीभूत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.