भारताची स्वदेशी " जीपीएस " यंत्रणा २०१४ पर्यंत

जीपीएस म्हणजेच Global Positioning System ( GPS ) हा एक मोबाईलप्रमाणे सर्वांच्या माहितीतला शब्द होत आहे. खरं तर ४५ वर्षे सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यामध्ये झालेल्या शीतयुद्धातले " जीपीएस " हे एक अपत्य.

Updated: Dec 29, 2011, 04:26 PM IST

अमित जोशी

 

नुकतीच एक जाहिरात एका मोबाईल कंपनीची टीव्हीवर झळकली होती. यामध्ये एक तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असते, तिला पत्ता माहित नसतो. तेव्हा ती मोबाईलवर असलेल्या जीपीएस यंत्रणेच्या  सहाय्याने रस्ता शोधत  घरी पोहचते. " आता जीपीएस सुविधा मोबाईलमध्येही  "अशी ती खरी जाहिरात होती. संरक्षण व्यवस्थेसाठी वापरली जाणारी यंत्रणा सर्वसामान्यांसाठी खुली केल्यावर त्याचे किती फायदे होतात त्याचे हे एक उदाहरण म्हणावे लागेल.

 

जीपीएस म्हणजेच Global Positioning System  ( GPS )  हा एक मोबाईलप्रमाणे सर्वांच्या माहितीतला शब्द होत आहे.  खरं तर ४५ वर्षे सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यामध्ये झालेल्या शीतयुद्धातले " जीपीएस " हे एक अपत्य. २० पेक्षा जास्त  संदेशवहन करणाऱ्या  उपग्रहांची एक श्रुंखला म्हणजे जीपीएस यंत्रणा. स्वतःची अवाढव्य संरक्षण व्यवस्था सुरळित सुरु रहावी यासाठी अमेरिकेने १९७3 पासून ही यंत्रणा विकसित करायला सुरुवात केली.  तेव्हा भारताच्या विकसित होणाऱ्या स्वदेशी  जीपीएस  यंत्रणेबद्दल माहिती घेण्याआधी अमेरिकेची जीपीएस यंत्रणा तसंच इतर देशांच्या " जीपीएस " सदृश्य यंत्रणेबद्दल माहिती घेऊया.

 

अमेरिकेची " जीपीएस " यंत्रणा

 

अमेरिका आणि सोव्हिएत रशिया ह्यांच्यामध्ये १९४५ पासून शीतयुद्धाला सुरुवात झाली. १९५७ ला जगातील पहिला कृत्रिम उपग्रह सोडत रशियाने शीतयुद्धाची दुसरी बाजू खूली केली. या काळात हे दोन्ही देश लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र ( पल्ला ८ ,००० किमी पेक्षा जास्त )  विकसित करत होते. ही क्षेपणास्त्रे जमिनीवरुन, हवेतून ( विमानातून) आणि पाण्याखालून ( पाणबुडीतून ) डागण्याची क्षमता दोन्ही देश विकसित करत होते.

 

 

समजा  आता एखादे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या हवाई दलाचा तळ असलेल्या कॅलिफोर्निया भागातून डागत ते मॉस्को किंवा रशियातील एखाद्या महत्त्वाच्या शहरावर फेकायचे आहे, तर त्या क्षेपणास्त्राची अचुकता महत्त्वाची ठरणार. ते क्षेपणास्त्र अचूक लक्ष्याच्या ठिकाणी पडावे यासाठी अमेरिकेने सोव्हिएत रशियाच्या सीमेलगतच्या मित्र राष्ट्रांच्या हद्दीत रडाराची एक श्रुंखला विकसित केली होती.  असे असले तरी अचुकता ही १०० टक्के नव्हती.   विशेषतः अथांग खोल समुद्रात गस्त घालणाऱ्या पाणबुड्यांच्या क्षेपणास्त्राला अचुकतेसाठी योग्य मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. १९७३ ला अमेरिकेच्या संरक्षण दलातील अति वरिष्ठ अधिका-यांनी डोकेफोड करत एक यंत्रणा विकसित करायचा निर्णय घेतला आणि जीपीएसचा जन्म झाला.

 

जीपीएसची कार्यपद्धती

 

जीपीएससाठी १९७४ पासून संदेशवहन कऱणारे  कृत्रिम उपग्रह सोडायला अमेरिकेने सुरुवात केली. या उपग्रहांची संख्या १० पर्यंत मर्यादीत होती, मात्र अधिक ताकदीचे उपग्रह सोडत १९९४ पर्यंत अमेरिकेच्या उपग्रहांनी संपु्र्ण पृथ्वी व्यापली, इंच इंच भाग व्यापला.

 

सध्याच्या अमेरिकेच्या जीपीएस यंत्रणेत ३० पेक्षा जास्त कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या अवकाश कक्षेत तब्बल २०,००० किमी उंचीवरुन, विशिष्ट कोन करत, साधारण १२ तासात एक पृथ्वीप्रदक्षिणा वेगाने घालत भ्रमण करत आहेत.  हे उपग्रह एक विशिष्ट सिग्नल सतत पाठवत असतात. पृथ्वीवर कुठल्याही ठिकाणी उभ्या असलेल्या व्यक्तिकडे जर जीपीएस रिसिव्हर असेल तर या संदेशाच्या सहाय्याने त्याला आपले स्थान शोधता येते. उपग्रहांची कक्षा आणि दिशा अशी विशिष्ट असते की त्या व्यक्तिला एकाच वेळी जास्तीत जास्त ८ ते ९ उपग्रहांचे संदेश मिळू शकतात. उपग्रहाकडून आलेला प्रत्येक संदेश ग्रहण करत रिसिव्हर त्याचे विश्लेषण करतो आणि  त्या व्यक्तिचे पृथ्वीवरील स्थान सांगतो. म्हणजे ती व्यक्ति जमिनीपासून किती उंचीवर कुठल्या अक्षांश-रेखांशच्या ठिकाणी उभी आहे, हे त्या विश्लेषणातून मिळालेले उत्तर सांगते , ते त्या व