www.24taas.com, मुंबई
ऍलन कारचं पुस्तक ‘इझी वे टू स्टॉप स्मोकींग’मुळे बॉलिवूड हंक हृतिक रोशनच्या अवती-भोवती आता धुराची वलयं दिसणं बंद झालंय. तीन महिन्यांपूर्वी डुग्गूने सिगारेट ओढणं बंद केलंय. आणि याबद्दल ‘इझी वे टू स्टॉप स्मोकींग’ या पुस्तकाचे तो आभार मानतोय. आणि जिथे तिथे या पुस्तकाची तो तारीफ करतोय.
“या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक कुठेही तुम्हाला सिगारेट सोडायला सांगत नाही. उलट, पुस्तक वाचताना सिगारेट ओढायचीच इच्छा आपल्याला अनावर होते. सिगारेट पिण्यातली गंमत यात लिहीली आहे. सिगारेट ओढण्याचे दुष्परिणाम, कॅन्सरची भीती याबद्दल काहीही बोलत नाही. पण, पुस्तकाचा शेवट येईपर्यंत आपल्यातली सिगारेट इच्छाच मरून जाते. यामुळे धुम्रपानाचं व्यसनच सुटतं. माझी धुम्रपानाचं व्यसन हे पुस्तक वाचून पूर्णतः सुटलं. आणि मला असं वाटतं की आणखी लोकांनी हे पुस्तक वाचावं आणि धुम्रपानाच्या व्यसनापासून मुक्त व्हावं” असं हृतिक म्हणाला. या पुस्तकाच्याने मॅडोना, ऍन्थोनी हॉपकिन्स आणि ऍश्टन कुचर यांसारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींची धुम्रपानाची सवयही सोडवली आहे.
हृतिक या पुस्तकाने एवढा प्रभावित झाला आहे की त्याने या पुस्तकाच्या २० प्रती विकत घेतल्या आहेत. यातलं एक पुस्तक त्याने संजय दत्तला भेट म्हणून दिली आणि त्याने सिगारेट ओढणं बंद करावं यासाठी प्रयत्न केले. तसंच एक पुस्तक हृतिकने चेन-स्मोकर असणाऱ्या शाहरुख खानला आणि एक फरहान आख्तरलाही दिलं आहे. यांनीही सिगारेट सोडावी यासाठी हृतिक मनापासून प्रयत्न करत आहे.
हृतिकच्या प्रयत्नांनी बहुतेक एक दिवस सबंध बॉलिवूडवरच ‘धुम्रपान निषेध’ची पाटी लागण्याची शक्यता आहे.