सोमदत्त शर्मा, www.24taas.com,मुंबई
कुख्यात डॉन अबु सालेमविरुद्ध सुरु असलेले सर्व खटले बंद करावेत, अशी विनंती याचिका सालेमच्या वकिलांनी टाडा कोर्टात दाखल केली आहे. मंगळवारी पोर्तुगालच्या सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचा संदर्भ देत ही याचिका करण्यात आली आहे. भारताकडून प्रत्यर्पण कायद्याचं उल्लंघन झाल्याचा निर्णय पोर्तुगाल सुप्रीम कोर्टानं दिला होता.
पोर्तुगालशी झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार २००५ साली अबु सालेमला भारतात आणण्यात आलं होतं. त्याच्यावर १९९३ च्या सिरीयल ब्लास्टमध्ये सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत जोपर्यंत सीबीआय यासंदर्भात आपली बाजू मांडत नाही, तोपर्यंत खटला सुरूच राहील, असं टाडा कोर्टानं म्हटलं.
याबाबतची पुढची सुनावणी २०जानेवारीला होणार आहे. एकूणच पोर्तुगाल सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि सालेमची याचिका यामुळं सीबीआयपुढचं आव्हान अधिक बिकट झालं आहे.