आता चायनिज नव्हे तर बिहारी राईस

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील एका ग्राम पंचायतीने भातपीक उत्पादनात चीनचा विक्रम मोडला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी ही माहिती संसदेला दिली.

Updated: Mar 20, 2012, 10:24 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली


बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील एका ग्राम पंचायतीने भातपीक उत्पादनात चीनचा विक्रम मोडला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी ही माहिती संसदेला दिली.

 

राज्य सरकारकडून मिळालेल्या रिपोर्टनुसार ओल्या भीतपीकाचे वजन प्रती हेक्टर २२.४ टन तर सूक्या भातपीकचे वजन प्रती हेक्टर २०.१६ टन नोंदवण्यात आलं असल्याचं पवारांनी लोकसभेला एका लेखी उत्तरात दिलं आहे. याआधी चीनने प्रती हेक्टरी १९ टन उत्पादन घेतलं होतं तो विक्रम नालंदा जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीने मागे टाकला आहे.

 

नालंदा जिल्ह्यातील कतरी सराई ब्लॉकमधील दरबेसपुरा पंचायतीने हे विक्रमी उत्पादन साध्य केलं आहे. भातपीकासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत सरकार प्रात्यक्षिकं आयोजीत करण्यासाठी तीन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देत असल्याचं पवारांनी सांगिलतलं. भातपीकाच्या उत्पादनवाढीला प्रोत्साहन मिळावं यासाठी हे सहाय्य देण्यात येतं.

 

सरकारने देशभरातील १६ राज्यातील काही जिल्हे त्यासाठी निवडले आहेत. भारताने २०११-१२ या वर्षात भाताचे १०२.७५ दशलक्ष टन इतक्या विक्रमी उत्पादनाची नोंद केली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत पूर्व भारतात हरित क्रांती आणण्यासाठी सरकारने भातपीक लागवडीला प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.