लक्ष्मण रावांना लहानपणापासूनच वाचनाची विलक्षण आवड आणि हिंदी साहित्याची ओढ होती. त्यामुळेच त्यांनी हिंदी माध्यमातून १९७३ साली मॅट्रिकची परिक्षा दिली. गुलशन बावरांच्या कादंबऱ्यांनी त्यांना वेड करुन सोडलं. रावांना परिस्थिती अभावी शिक्षण सोडून स्पिनिंग मिलमध्ये नोकरी धरावी लागली. पण तरीही ते अवस्थ होते, कारण आतंरिक लिखाणाची ओढ त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. रावांनी मग एके दिवशी गाव सोडलं आणि भोपाळमध्ये येऊन थडकले. रावांच्या मित्रांनी त्यांना हिंदीत चांगला लेखक होण्याचा सल्ला दिला आणि त्यासाठी हिंदी भाषिक प्रदेशात बस्तान बसवणं आवश्यक होतं. दिल्लीत हिंदी पुस्तकं मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होतात हे ठाऊक असल्याने रावांनी भोपाळहून दिल्लीकडे प्रस्थान केलं.
दिल्लीतील दर्यागंज मार्केट त्यांनी पुस्तकांच्या शोधात पालथं घातलं. एकीकडे रोजच्या जगण्यासाठीचा संघर्ष करत असतानाच रावांनी दिल्ली विद्यापीठातून पत्राद्वारे कला शाखेतली पदवी प्राप्त केली. चहाच्या टपरीवर परिक्षेच्या तयारी असतानाच दिल्ली महानगरपालिकेने त्यांचा स्टॉल तोडून टाकला, पण राव डगमगले नाहीत. रावांनी कागदपत्रांच्या आधारे परत स्टॅलसाठी पाठपुरावा केला, पण त्यांच्या पदरी कटू अनुभव आला. या सगळ्यात आयुष्याच्या चढउतारांना एखाद्या संत महात्म्याप्रमाणे शांत चित्ताने सामोरे गेले.
रावांनी लेखक होण्यासाठी दिल्ली गाठली होती, हे ते विसरले नाहीत. दिवसभर चहा विकल्यावर रात्री चार तास ते नियमाने लिखाण करतात. आज रावांची एकूण २४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यातल्या दोन पुस्तकांच्या दोन दोन आवृत्या निघाल्या. रावांचे पहिले पुस्तकं नई दुनिया की नई कहानी हे १९७९ साली त्यांनी स्वत: प्रकाशीत केलं. रावांनी लिहिलेले प्रधानमंत्री हे नाटक १९८४ साली प्रकाशित झालं. त्यानंतर त्यांनी लिहिलेली कादंबरी रामदास १९९२ साली प्रकाशित झाली आणि दिल्लीच्या २०० शाळांनी ती विकत घेतली. रावांच्या लिखाणाचे कौतुक माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी देखील केलं आहे.
राव एका पुस्तकाच्या विक्रीतून जमा झालेल्या पैशांचा विनियोग दुसऱं पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी करतात. लक्ष्मण रावांची जीवनकहाणी ही निर्धार आणि आत्मनिर्भरता शिकवते. आज ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह दिल्लीच्या शाकरपूर भागात राहतात. राव चहा विकून दिवसाला फक्त २०० रुपये कमावतात पण अशा बिकट परिस्थितीही त्यांचे लिखाण नित्यनेमाने चालूच असते. रावांचा मुलगा पुढच्या वर्षी सीएचे शिक्षण पूर्ण करेल त्यानंतर चहाची टपरी बंद करुन पूर्ण वेळ लिखाण आणि प्रकाशनासाठी देण्याचा त्यांचा मानस आहे.