दिल्ली बॉम्बस्फोटाचा आरोपी झाला ठार

दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आमीर अली कमाल संरक्षण दलाबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला आहे.

Updated: Aug 8, 2012, 02:58 AM IST

www.24taas.com, श्रीनगर

 

दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आमीर अली कमाल संरक्षण दलाबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. या चकमकीत आमीर अली कमाल हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी मोहम्मद शफी ऊर्फ साकीबदेखील मारला गेला आहे.

 

किश्तवार जिल्ह्यातील थ्रोथीलच्या जंगलात लपून बसलेल्या या दोन दहशतवाद्यांची माहिती मिळताच राष्ट्रीय रायफल्सच्या १७ जवानांनी नाकाबंदी केली व दहशतवाद्यांवर गोळीबार केला. तीन तास चाललेल्या या चकमकीत हे दोघे दहशवादी ठार झाले. या दोघांकडे एके रायफल आणि पिस्तूल सापडली आहे.

 

आमीर अली कमाल हा हिब्जुल मुजाहिद्दीनचा खतरनाक दहशतवादी असून गेल्या वर्षी दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर झालेल्या दहशवादी हल्ल्याचाही मुख्य आरोपी आहे. ७ सप्टेंबर २०११ ला उच्च न्यायालयात झालेल्या बॉम्बस्फोटात १५ जण ठार तर ५० जण जखमी झाले होते.