www.24taas.com, कोलकाता
तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या शपथविधीला जाणार नसल्याचे घोषित केले होते. परंतु यात आपल्या निर्णयावर पलटी मारली. ममता बॅनर्जी यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
नव्याने सत्तेवर आलेल्या प्रकाशसिंग बादल यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी काही मुख्यमंत्र्यांना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. बॅनर्जी यांनाही बादल यांचे निमंत्रण मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस आणि बॅनर्जी यांचे संबंध ताणले गेले असल्याने निमंत्रणाबाबत बॅनर्जी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बॅनर्जी यांनी समारंभाला जाणार नसल्याचे आज घोषित केल्याने कॉंग्रेसने सुटकेचा निःश्वास टाकला होता. मात्र लागलीच बॅनर्जी यांनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली. पश्चिम बंगालला दुजाभाव देत असल्याचा आरोप ममता दिदिनी केला आहे.
केंद्र सरकारला पश्चिम बंगालकडून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत असतानाही आमच्या तोंडाला केवळ पाने पुसली जातात, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे. डाव्यांच्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत पश्चिम बंगाल दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आले असतानाही केंद्र सरकार आम्हाला मदत करीत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.