www.24taas.com, नवी दिल्ली
मारूतीच्या कारखान्यात बुधवारी झालेल्या हिंसाचारानंतर टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. हिंसाचाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत मानेसर येथील कारखान्यात टाळेबंदी केली जाईल, अशी घोषणा मारुती-सुझुकी इंडिया लिमिटेडने केली आहे.
माझ्यासाठी पैसे कमावण्यासाठी कारचे उत्पादन घेण्यापेक्षा माझ्या सहकार्यांची सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे. हा कारखाना अन्यत्र स्थानांतरित केला जाणार नाही. हिंसाचाराची चौकशी पूर्ण होणार नाही आणि भविष्यात कर्मचार्यांच्या सुरक्षेचे उपाय सुनिश्चित केले जाणार नाहीत, तोपर्यंत टाळेबंदी कायम राहील, असे कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव म्हणाले.
कारखान्यात झालेल्या हिंसाचारात महाव्यवस्थापक (एमआर) अवनीश कुमार देव यांचा जळून मृत्यू झाला होता, तर अन्य ९0 अधिकारी आणि सुपरवायझर जखमी झाले होते.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे जपान दौर्यावर जात असल्याने मानेसर कारखाना गुजरातमध्ये स्थानांतरित केला जाणार असल्याची अफवा पसरली आहे. कारखाना स्थलांतरित केला जाण्याची शक्यता भार्गव यांनी फेटाळून लावली. येथे मारुतीच्या एसएक्स ४, स्विफ्ट, डिझायर आणि ए-स्टार या कारचे उत्पादन घेतले जाते.