युवक काँग्रेस संमेलनात पंतप्रधान व सोनिया गांधी

नवी दिल्ली येथे युवक काँग्रेस संमेलनाला पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन केलं. याच युवक काँग्रेसच्या अधिवेशनात शस्त्रक्रियेनंतर प्रथमच सोनिया गांधीं सार्वजनिक सभेत बोलत होत्या.

Updated: Nov 29, 2011, 06:22 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

नवी दिल्ली येथे युवक काँग्रेस संमेलनाला पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन केलं.

 

रिटेल क्षेत्रात FDI चा निर्णय विचारपुर्वक घेतल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलंय. याचा शेतकऱ्यांना फायदा होईल असा दावा त्यांनी केलाय. राज्यांना त्याबाबत सक्ती नसल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. या प्रकरणी संसदेत गदारोळ करण्यापेक्षा विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं. पुढच्या काही महिन्यांत महागाई कमी होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. २००८ साली आर्थिक मंदीला देश धैर्यानं सामोरा गेला, आताच्या आर्थिक अरिष्टांना तोंड देण्यासही सरकार सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलंय. दिल्लीत युवक काँग्रेसच्या अधिवेशनात पंतप्रधान बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या कामाचंही कौतुक केलं. राहुल गांधींच्या युवा काँग्रेसमुळे पक्षाला बळकटी मिळाली असून गेल्या सात वर्षांत देशात विकासाचा दर वाढला असल्याचं पंतप्रधानांनी या सभेत सांगितलं. आज देशाला काँग्रेसची गरज असल्याचंही पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले

 

याच युवक काँग्रेसच्या अधिवेशनात सोनिया गांधींनीही भाषण  दिलं. आजार आणि शस्त्रक्रियेनंतर प्रथमच त्या सार्वजनिक सभेत बोलत होत्या.  भ्रष्टाचार मिटवण्यासाठी काँग्रेसचं सरकार कटिबद्ध असल्याचा, पुनरुच्चार काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी या सभेत केला. भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी सरकारच्या पातळीवर सर्व प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकपाल बिल संसदेत मंजूर करण्यासाठी विरोधक सहकार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. प्रशासन, न्यायपालिका आणि निवडमुकांच्या पद्धतीत सुधारणा आणण्याची गरजही त्यांनी या भाषणात व्यक्त केलीय. आजारपणानंतर सुमारे ४ महिन्यांनी सोनिया गांधी यांनी जाहीर कार्यक्रमात जाहीर भाषण केले. युवक हेच देशाचं आशास्थान असून, अधिकाधिक तरुणांनी राजकारणात येण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.