www.24taas.com, चेन्नई
केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांची प्रकृती चिंताजनक असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार चेन्नईत दाखल झाले आहेत.
विलासरावांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे चेन्नईत पोहोचलेत्यांच्याशिवाय आणखी आठ मंत्री चेन्नईत दाखल झाले आहेत. बाळासाहेब थोरात, आर. आर. पाटील, जयंत पाटील, नसीम खान, राजेंद्र दर्डा या मंत्र्यांचा त्यात समावेश आहे. विलासरावांना सध्या कोणालाही भेटू दिले जात नाही. रक्तामध्ये जंतू संसर्ग झाल्यामुळे विलासरावांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी विलासरावांच्या कुटुंबियांची भेट घेऊन प्रकृतीबाबत विचारपूस केली.
विलासरावांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात ब्ल़ड इन्फेक्शन झाल्यानं शरीरातल्या अनेक अवयवांना इजा पोहचली आहे. त्यामुळं डॉक्टरांनी तूर्तास यकृत प्रत्यारोपणाचा निर्णय पुढं ढकलला आहे. विलासरावांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
शरिरातलं ब्लड़ इन्फेक्शन थांबल्याशिवाय कोणताही निर्णय तूर्तास घेण्यात येणार नसल्याचंही हॉस्पिटलकडून सांगण्यात आलंय. विलासरावांच्या यकृतात मोठा बिघाड झाल्यानं यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय.मात्र ब्लड इन्फेक्शनमुळं मोठा अडथळा निर्माण झालाय. प्रख्यात यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉक्टर मोहम्मद रेला यांच्या निरीक्षणाखाली ते आहेत.
विलासरावांना सध्या व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आलंय. पुढील दोन दिवसांत त्यांची प्रकृती सुधारली तर त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येण्याची शक्यता आहे.