'स्त्री भ्रूण हत्ये'च्या प्रश्नावर आमिर रस्त्यावर?

मुलींचं घटत जाणारं प्रमाण लक्षात घेऊन बिहार सरकारनं ‘बिटीया बचाओ आंदोलन’ सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. आणि यासाठी त्यांना मदत हवीय अभिनेता आमीर खानची...

Updated: May 30, 2012, 11:14 AM IST

 www.24taas.com, पाटणा

 

मुलींचं घटत जाणारं प्रमाण लक्षात घेऊन बिहार सरकारनं ‘बिटीया बचाओ आंदोलन’ सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. आणि यासाठी त्यांना मदत हवीय अभिनेता आमिर खानची. इतकंच नव्हे तर राज्य सरकारनं बिहारचा ब्रँड  अॅम्बेसेडर होण्यासाठी आमिरला विचारणाही केलीय.

 

आजपासून भागलपूरच्या अजगैवीनाथ धामपासून या आंदोलनाची सुरूवात होतेय. संपूर्ण राज्यभर या आंदोलनाच्या साहाय्यानं जनजागृती करण्यात येणार असल्याचं राज्य आरोग्यमंत्री अश्विनी चौबे यांनी म्हटलंय. सरकारकडे उपलब्ध असलेल्या आकड्यांनुसार, अल्ट्रासाऊंड सेंटर्सची संख्या जास्त असलेल्या भागात मुलींची संख्या दिवसेंदिवस घटताना आढळून येतेय.

 

राजधानी पटनामध्ये २००१ साली प्रत्येक हजार मुलांमागे मुलींची संख्या ९२३ होती. पण हीच संख्या २०११ साली ८९९ पर्यंत पोहचली तर भागलपूर जिल्ह्यातील मुलींची संख्या ९६६ वरून ८९३वर घसरली असल्याची माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली. राज्यात भ्रूण हत्यांची संख्या वाढल्याचं यावेळी त्यांनी कबूल केलंय. आणि यासाठीच आमिर खानला त्यांनी ब्रँड अॅम्बेसेडर होण्यासाठी पाचारण केलंय. आमिर खानचा सहभाग असेल तर हा कार्यक्रम लोकांपर्यंत अधिक तीव्रतेने पोहचेल, अशी आशा त्यांना वाटतेय.

 

काही दिवसांपूर्वीच आमिर खाननं आपल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातून कन्या भ्रूण हत्येच्या प्रश्न मांडला होता. आता आमिर खरंच रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जनजागृतीचा प्रयत्न करणार का? हे लवकरच दिसेल.