सरकारने पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडली, लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिझ सईद, दोन आयएसआयचे अधिकारी यांच्यासह नऊ जणांवर २६/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्या संदर्भात आरोपपत्र दाखल करण्याची अनुमती दिली आहे.
हेडली आणि सईद यांच्या व्यतिरिक्त गृह मंत्रालयाने नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सीला २६/११ चा मास्टर माईंड झकी उर रहमान लखवी, हेडलीचा साथीदार तहव्वूर राणा आणि अल कायदाचा सदस्या इलियास काश्मिरी याच्या विरोधातही आरोपपत्र ठेवण्यास मंजुरी दिली आहे. आरोपत्रात साजिद मलिक आणि अब्दुल रहमान हश्मी यांच्या बरोबर आयएसआयचे दोन अधिकारी मेजर इकबाल आणि मेजर समीर अली यांच्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे.
न्याय मंत्रालयाने दिलेल्या कायदेशीर सल्ल्यानंतर दावा दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एनआएने १२ नोव्हेंबर रोडी हेडली आणि राणा यांच्या विरोधात केस दाखल केली आहे. सध्या हेडली आणि राणा हे दोघेही अमेरिकेच्या ताब्यात आहेत. एनआयएला हेडलीची मर्यादित चौकशीच करता आली. हेडलीने कठोर शिक्षा टाळण्यासाठी अमेरिकेन यंत्रणेसोबत दयेची याचना आणि तडजोड केली आहे.