www.24taas.com, पोमेंडी
दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण रेल्वे प्रशासनाने मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केलीय. गतवर्षी पावसाळ्यात डोकेदुखी ठरलेल्या पोमेंडी रेल्वे मार्गावरील अजस्त्र डोंगर हटवण्याचे काम जवळपास पूर्ण झालंय. तरीही रेल्वेमार्गाला असलेला धोका कायम आहे.
गेल्या पाच वर्षांपासून पावसाळ्यात कोकण रेल्वेचा खोळंबा होत आलेला आहे. सुरुवातीला निवसर आणि नंतर पोमेंडीमधील घटनामुळं पावसाळ्यात कोकण रेल्वेला संकटांचा सामना करावा लागला. मागील वर्षी तर पोमेंडी रेल्वे मार्गावरचा डोंगर रुळांच्या दिशेनं सरकला आणि दहा दिवस कोकण रेल्वे ठप्प झाली. आतापर्यंत निवसर आणि पोमेंडीवर रेल्वे प्रशासनानं 26 कोटी खर्चण्यात आले असले तरी रेल्वे अधिकारी अजून निसर्गावरच अवलंबून आहेत.
पोमेंडीच्या समस्येला पर्याय म्हणून सुमारे 27 कोटींच्या पर्यायी मार्गाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडं पाठवण्यात आला असला तरी पुढील दोन वर्षे तरी हे काम सुरु होणं शक्य नाही. त्यामुळं आहे त्या परिस्थितीत योग्य उपाय करणं गरजेचं आहे. तसंच पावसाळा संपल्यानंतर लगेचच कामे हाती घेण्याची गरज असताना जानेवारी-फेब्रूवारीमध्ये मार्ग दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. त्यामुळं रेल्वेच्या कारभारावर रेल्वे प्रवाशी नाराज आहेत.
निसर्गाशी दोन हात करत कोकण रेल्वे प्रशासनानं प्रचंड मेहनतीनं अनेक समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि करोडो रुपये खर्चूनही प्रवाशांचा जीव आजही टांगणीला लागलेला आहे.