अखेर बिबट्या जाळ्यात आलाच.....

नाशिकमध्ये आज बिबट्याचं थरारनाट्य रंगलं. भक्षकाच्या मागे लागलेला बिबट्या नागरी वस्तीत घुसला आणि त्यानंतर थेट एका बंगल्यात शिरला. बंगल्याचे मालक शेलार यांना बिबट्यानेगंभीर जखमी केले असताना, त्यांच्या पत्नीने धैर्य दाखवत बिबट्याला चपळाईने एका खोलीत बंद केले.

Updated: Mar 26, 2012, 05:10 PM IST

www.24taas.com, नाशिक 

नाशिकमध्ये आज बिबट्याचं थरारनाट्य रंगलं. भक्षकाच्या मागे लागलेला बिबट्या नागरी वस्तीत घुसला आणि त्यानंतर थेट एका बंगल्यात शिरला. बंगल्याचे मालक शेलार यांना बिबट्यानेगंभीर जखमी केले असताना, त्यांच्या पत्नीने धैर्य दाखवत बिबट्याला चपळाईने एका खोलीत बंद केले.

नाशिकमधल्या गजानन कॉलनीतल्या संतकृपा बंगल्यात घुसलेला बिबट्या बंगल्यात शिरताच बिबट्यानं बंगल्याचे मालक शेलार यांना जखमी केलं. घरातील सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. बिबट्यानं भल्या पहाटे थरार मांडला होता. शेलार जखमी झाले असताना त्यांच्या पत्नीने कमालीचे धैर्य दाखवत घराचे सर्व दरवाजे बंद केले आणि त्यानंतर बिबट्याला चपळाईनं किचन रुममध्ये अडकवलं. बिबट्या एका खोलीत, तर दुसऱ्या खोलीत त्या स्वतः अडकून पडल्या होत्या. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी पोचले आणि त्यांनी किचनला छिद्रे पाडून त्यातून बिबट्यावर इंजेक्शनचा मारा केला.

सुरवातीला गोदावरी काठच्या गजानन कॉलनीत पाणी पिण्यासाठी आलेला बिबट्या भक्षकाच्या मागे लागला आणि थेट नागरी वस्तीत घुसला. बिबट्याला पाहताच अनेकांची पळापळ झाली. लोकांनी आरडाओरड केल्यामुळे भांबावलेल्या बिबट्यानं एका शाळकरी मुलीसह सहा जणांवर हल्ला केला. शहरात बिबट्या येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. बिबट्याच्या या दहशतीनं नाशिककर हैराण झाले आहेत. तब्बल सहा तासांनंतर वनअधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद केल्यानंतर अखेर नाशिककरांनी सुटकेचा निश्वास टाकला.