तापी घोटळ्यात सुरेश बोरोलेंना अटक

जळगाव जिल्ह्यातल्या तापी पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश बोरोले यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मुरबाडमध्ये जळगाव स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ५०कोटींहून अधिक अपहार केल्याचा आरोप बोरोले यांच्याविरोधात आहे

Updated: May 29, 2012, 06:38 PM IST

www.24taas.com, जळगाव

 

जळगाव जिल्ह्यातल्या तापी पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश बोरोले यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मुरबाडमध्ये जळगाव स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ५०कोटींहून अधिक अपहार केल्याचा आरोप बोरोले यांच्याविरोधात आहे. याप्रकरणी जळगाव शहर आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आलाय.

 

गेल्या वर्षभरापासून तापी पतसंस्थेचे संचालक सुरेश बोरोले आणि त्यांचे पुत्र पंकज बोरोले हे फरार होते. सुरेश बोरोले हे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे व्याही आहेत. अखेर सुरेश बोरोलेला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलंय.

 

बोरालेंनी संगनमतानं आपल्या नातेवाईकांच्या नावे पन्नास कोटींचं कर्ज घेतलं होतं. मात्र त्यापोटी तारण म्हणून किरकोळ मालमत्ता ठेवल्या होत्या. ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदार पतसंस्थेचे उंबरठे झिजवत आहेत. सत्तर हजार ठेवीदारांचे सुमारे दोनशे कोटी रूपये या पतसंस्थेत अडकलेत. या प्रकरणामुळे बोरालेंचे व्याही असलेले विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेही चांगलेच अडचणीत सापडलेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर बोराले यांनी सुप्रीम न्यायालयातही दाद मागितली होती. मात्र त्यांना कुठेच दिलासा मिळाला नव्हता.