दिवेआगर चोरी : चोरांचा लागला छडा

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर सुवर्णगणेश चोरीप्रकरणाचा छडा लागला आहे. या प्रकरणी शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गणेशमूर्तीचे अवशेष आणि दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

Updated: Apr 25, 2012, 09:46 AM IST

www.24taas.com, अहमदनगर

 

 

रायगड जिल्ह्यातील  दिवेआगर सुवर्णगणेश चोरीप्रकरणाचा छडा लागला आहे. या प्रकरणी शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गणेशमूर्तीचे अवशेष  आणि दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

 

 

सुमारे दीड महिन्यापूर्वी दिवेआगर येथील गणेशमंदिरावर दरोडा टाकून तेथील सुवर्ण गणेशमूर्ती लंपास करण्यात आली होती. त्या वेळी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले होते.

 

 

पुणे पोलिसांनी अन्य एका गुन्ह्य़ात सतीश गेणू काळे (रा. वैजापूर) याला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून पोलिसांनी गणेशमूर्ती चोरीचा सुगावा लागला. त्यावरून पुणे पोलिसांनी रविवारी रात्री ते सोमवारी पहाटे या काळात अहमदनगर पोलिसांच्या मदतीने कारवाई करून, अहमदनगर जिल्ह्य़ातील घोसपूरी या गावातून खैराबाई विक्रम भोसले, विक्रम हरिभाऊ भोसले आणि कैलास निवृत्ती भौसले या तिघांना अटक केली. या तिघांनीही गुन्ह्य़ाची कबुली दिली आहे.

 

 

या चोरट्यांनी डोंगरात लपवून ठेवलेली गणेशमूर्ती आणि दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. मात्र ही गणेशमूर्ती अभंग आहे की ती वितळविण्यात आली होती, याबाबत मात्र अद्याप संभ्रम आहे.  दरम्यान,  गणेश मंदिरातील सीसीटीव्हीच्या छायाचित्रणावरून दोन संशयितांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.