www.24taas.com, नाशिक
नाशिक शहराच्या विकासासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या 'झी २४ तास'च्या 'नाशिक फर्स्ट' समीटमध्ये आज दिग्गजांनी विकासाचा रोडमॅप मांडला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या उपस्थितीत उदघाटन झालेल्या या उपक्रमाचं स्थानिक उद्योजकांनी कौतुक केलं. 'झी २४ तास'च्या माध्यमातून नाशिकच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ मिळाल्यानं आता खऱ्या अर्थानं 'नाशिकचं एक पाऊल पुढं' पडल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महापौर यतीन वाघ, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि झी २४ तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 'नाशिक फर्स्ट' समिटला सुरूवात झाली. माहिती तंत्रज्ञान, उद्योग, पायाभूत सुविधा, अन्न आणि कृषी प्रक्रिया, आणि घर बांधणी उद्योग अशा विषयांवर चर्चासत्रात महत्वपूर्ण चर्चा झाली. 'नाशिक फर्स्ट' या संकल्पनेचं ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कौतुक केलं. ५० वर्षापूर्वी मुंबईच्या विकासासाठी 'मुंबई फर्स्ट' अशी संकल्पना राबविली असती तर मुंबईचा अधिक विकास झाला असता, असं मत केतकर यांनी व्यक्त केलं.
नाशिकच्या विकासासाठी औद्योगिक क्षेत्राचा विकास गरजेचा असल्याचं महसूलमंत्र्यांनी म्हटलं. 'झी २४ तास'नं घेतलेल्या पुढाकाराचं त्यांनी कौतुक केलं. 'झी २४ तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी 'उद्याचं नाशिक आणि उद्याचा महाराष्ट्र' घडविण्यामागची संकल्पना व्यक्त केली. शहराचा विकास प्रचंड वेगानं होत असल्यानं त्याला दिशा देण्यासाठी नाशिकची निवड केल्याचं निरगुडकर यांनी स्पष्ट केलं.