www.24taas.com, नाशिक
गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर झालेली राज्यराणी एक्सप्रेस आजपासून मार्गस्थ झाली. नाशिकहून सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी निघणा-या या रेल्वेमुळं चाकरमान्यांना कार्यालयीन वेळेत मुंबईत पोचणं शक्य होणार आहे.
मंजूर झाल्यानंतर तब्बल एका वर्षानंतर ही गाडी सुरू करून नाशिककरांनी नाराजी दूर कऱण्याचा प्रयत्न रेल्वे खात्यानं केलाय. सुपरफास्ट दर्जा देण्यात आलेली ही गाडी पहाटे ५ वाजून २५ मिनिटांनी मनमाडवरून निघेल. त्यानंतर ६.२२ ला नाशिक तर ७.२२ ला इगतपुरीला पोचेल. सायंकाळी सात वाजता ही गाडी कुर्ल्याहून परतीच्या प्रवासासाठी निघेल आणि रात्री सव्वा अकराला मनमाडला पोचेल. पंचवटी एक्सप्रेसनंतर राज्य राणी एक्सप्रेसमुळं नाशिककरांना एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
रेल्वेने माल वाहतुकीत 30 टक्के दरवाढ
रेल्वेने माल वाहतुकीमध्ये ३० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. बजेटपूर्वीच भाडेवाढीचा दणका दिल्याने नाशिकमधल्या द्राक्ष-कांदा व्यापारी संघटनेने निषेध व्यक्त केलाय. वाहतुकदारांना विश्वासात न घेता दरवाढ केल्याने व्यापारी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.