पाणी संपणार... आता करायचे काय?

धुळे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा कधी नव्हे इतका खालावला आहे. आगामी काही दिवसांतच जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेठाक पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Updated: May 15, 2012, 09:09 PM IST

www.24taas.com, धुळे

 

धुळे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा कधी नव्हे इतका खालावला आहे. आगामी काही दिवसांतच जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेठाक पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासन चांगलंच धास्तावलं आहे. महाराष्ट्राचा ग्रामीण भाग दुष्काळामुळं अक्षरश: होरपळून निघत असतानाच राज्यातील जे काही जलप्रकल्प आहेत, तेही आता कोरडे पडले आहेत.

 

मान्सूनच्या शेवटी पावसानं मारलेली दांडी आणि ४३ डिग्री सेल्सीअसपर्यंतचं तापमान. धुळे जिल्ह्यातील ४७ लघु प्रकल्पांपैकी ३० प्रकल्पांमधील जलसाठा शून्यावर आला आहे. तर उरलेल्या १७ लघुप्रकल्पांमध्ये फक्त २ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. तसंच ११ मध्यम प्रकल्पांपैकी २ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लकच नाही आहे. तर उर्वरीत ९ प्रकल्पांमध्ये फक्त २३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १० टक्के कमी पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा  जादातर १० जूनपर्यंत पुरु शकतो. अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पाण्याचा होणारा तुटवडा लक्षात घेऊन धुळे महापालिकेनं सुलवाडे बॅरेज आणि हरणमाळ धरणाचा जलसाठा सिंचन विभागाला आगाऊ रक्कम देऊन आरक्षित केला आहे. त्यामुळं धुळे शहराला आता या आरक्षित जलसाठ्यातून पाणीपुरवठा केला जाणार आहे.

 

आतापासूनच धुळे जिल्ह्यातील जनता पाण्यासाठी वणवण करताना दिसत आहे. शिल्लक पाणीसाठा संपल्यास आणि वरुणराजाचं लवकर आगमन न झाल्यास जिल्ह्यात पाण्यासाठी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.