झी 24 तास वेब टीम, मुकुल कुलकर्णी-नाशिक
निवडणुकांचा मौसम असल्यानं विविध पोस्टर्समुळे नाशिक बकाल झालं आहे. त्यातच आता भर टाकली आहे ती वाहतूक पोलिसांनी. त्यामुळे नाशिककर आणखी वैतागलेत. जुन्या गंगापूर परिसरात उभारण्यात आलेलं हे होर्डिंग सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतं आहेत.
वाहतूक नियमांचं उल्लंघन करणारे फोटो, त्यांच्यावर केलेली कारवाई यांची माहिती लावण्यात आली आहे. अशीच होर्डिंग्ज तीन ते चार ठिकाणी लावण्यात आली आहेत. असे फलक बघून इतर वाहन चालक नियमांची पायमल्ली करणार नाहीत, अशी आयडियाची कल्पना पोलिसांनी लढवली. नाशिककर मात्र या होर्डिंगवर नाराज आहेत. नुसती होर्डिंग्ज लावण्यापेक्षा प्रत्यक्षात कारवाई करा, असं नाशिककरांचं म्हणणं आहे.
शहरात रोज सकाळ संध्याकाळ वाहतुकीची कोंडी होतेय. या कोंडीची नागरिकांना माहिती व्हावी आणि एका SMS वर कुठल्या मार्गानं प्रवास करावा, हे समजावं यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून ट्रॅफिक सेलची निर्मिती करण्यात आलीय. पण गेल्या पाच महिन्यांत एकही SMS आलेला नाही. निवडणुका असल्यानं आधीच विविध पोस्टर्स आणि होर्डिंगमुळे नाशिक विद्रुप झालं आहे. त्यातच पोलिसांनीही भर पाडल्यानं नाशिककर आणखी वैतागलेत.