www.24taas.com, नाशिक
नाशिकमध्ये लेकींचा आवाज आज दुमदुमला. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी जागर हा जाणिवांचा तुझ्या माझ्या लेकींचा या उपक्रमार्गतं शहरातून पदयात्रा काढण्यात आली. राज्यात मुलांच्या तुलनेत मुलींच प्रमाण कमी होत आहे. २०११च्या जनगणनेनुसार ठाणे जिल्ह्यात १ हजार मुलींमागे ९१८ तर सिंधुदूर्गमध्ये ९१० तर कोल्हापूर ८४५ ,पुण्यात ८७३, मुंबई ८७४ नाशिकमध्ये ८८२ तर औरंगाबादमध्ये हे प्रमाण ८४८ आहे.
राज्याचा विचार केला तर मुलामुलींमधल्या फरकाचा आकडा ११७ आहे. दिवसेंदिवस हा फरक वाढतो आहे. त्यामुळं समाजप्रबोधन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननं 'जागर हा जाणिवांचा, तुझ्या माझ्या लेकींचा' हा उपक्रम राबवला जातो आहे. त्या अंतर्गत नाशिकमध्ये प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली.
महिलांवरच्या अत्याचाराबाबतचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून गुन्हेगारांना कडक शिक्षा करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. जागर जाणिवांच्या उपक्रमाला नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अशा उपक्रमातून प्रबोधन होऊन मुले आणि मुलींमध्ये भेद करण्याची वृत्ती दूर करण्याची गरज आहे.