पुणे महापालिकेची 'फाईव्ह स्टार' शाळा

पुणे महापालिकेच्या राजीव गांधी इ-लर्निंग स्कूल हा प्रकल्प लक्ष्यवेधी ठरलाय. या शाळेतल्या विद्यार्थ्यांना फाईव्हस्टार सुविधा पुरवण्यात आल्यात. महापालिकेची ही हाय-फाय शाळा पुण्यात चर्चेच्या विषय बनलीये.

Updated: Dec 6, 2011, 07:10 AM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

पुणे महापालिकेच्या राजीव गांधी इ-लर्निंग स्कूल हा प्रकल्प लक्ष्यवेधी ठरलाय. या शाळेतल्या विद्यार्थ्यांना फाईव्हस्टार सुविधा पुरवण्यात आल्यात. विद्यार्थ्यांच्या रोजचा नाश्ता आणि जेवणावर तब्बल १५५ रुपये खर्च करण्यात येणार आहे. महापालिकेची ही हाय-फाय शाळा पुण्यात चर्चेच्या विषय बनलीये.

 

बड्य़ा इंग्रजी शाळेशी स्पर्धा करेल अशी शाळा पुणे महापालिकेची आहे हे सांगूनही विश्वास बसणार नाही. पुणे महापालिकेच्या राजीव गांधी इ-लर्निंग स्कूलला चक्क कॉर्पोरेट लूक देण्यात आलाय. सीबीएसईच्या पॅटर्नच्या या इंग्रजी शाळेत ८०० विद्यार्थी शिक्षण घेतायेत. विद्यार्थ्यांना पाच जोड गणवेश आणि तीन जोड बुट देण्यात आले आहेत.

 

याहून मोठी गोष्ट म्हणजे शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पंचवीस रुपयांचा नाश्ता आणि १३० रुपयांची जेवणाची थाळी देण्यात येणार आहे. महापालिकेच्या इतर शाळांच्या तुलनेत या शाळेवरच अशी खैरात कशासाठी असा आक्षेप घेतला जातोय. शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनीही नाराजीचा सूर लावलाय. पण, पुण्यातल्या या हायफाय इ-लर्निंग स्कूलवर होणाऱ्या खर्चावर टीका होत असली तरी शाळेत शिकणारी मुलं आणि त्यांचे पालक मात्र खुशीत आहेत.