पुण्यात अखेर मगर मुठीत

पुण्यात खडकवासला धरणातलं ऑपरेशन मगर अखेर फत्ते झालंय. बारा तासांच्या प्रयत्नांनंतर मगरीला जाळ्यात पकडण्यात यश आलंय. मगर जेरबंद झाल्यावर पुणेकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Updated: Feb 28, 2012, 09:31 PM IST

www.24taas.com, पुणे- अरुण मेहेत्रे    

 

पुण्यात खडकवासला धरणातलं ऑपरेशन मगर अखेर फत्ते झालंय. बारा तासांच्या प्रयत्नांनंतर मगरीला जाळ्यात पकडण्यात यश आलंय. मगर जेरबंद झाल्यावर पुणेकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

रात्रीच्या अंधारात सुरू झालं एक अनोखं सर्च ऑपरेशन... हातात जाळं आणि टॉर्च घेऊन सुरू होता एका हिंस्र जनावराचा शोध.... खडकवासला धरणात एक मगर गेले काही दिवस धुमाकूळ घालत होती. कालव्यात खेकडे पकडायला गेलेल्यांना सोमवारी रात्री साडे आठच्या सुमाराला ही मगर दिसली. थोड्याच वेळात बातमी कानोकानी पसरली आणि अग्निशमन दलाचे जवान, वन विभाग कर्मचारी, कात्रज सर्पोद्यानाचे कर्मचारी असे सगळेच मगरीला पकडायला सज्ज झाले. आणि सुरू झालं मगरीचं सर्च ऑपरेशन....

 

प्रेक्षकांची संख्याही भरपूर होती. मगरीला पकडायला धावाधाव सुरू होती आणि मगर काही केल्या दाद देत नव्हती. कधीकधी हाताशी आलेली मगर जाळ्याखालून पटकन पसार व्हायची. एकानं पाण्यात सूर मारुन तिला पकडलंही पण ती त्यालाही झटका देऊन निसटली. मगरीचा हा लपंडाव तब्बल सहा तास चालला. रात्री साडे आठला सुरू असलेलं हे सर्च ऑपरेशन अडीच पर्यंत चाललं....   सर्च ऑपरेशनवेळी मगर पकडणा-यांमध्ये धाडस होतं, पण कौशल्याचा अभाव दिसून आला. फक्त दोन जाळी, तीही जमिनीवरच्या प्राण्यांना पकडण्यासाठी आणि साच ते सहा टॉर्चेस एवढीच साधनसामुग्री या कर्मचा-यांजवळ होती.

 

पुन्हा मंगळवारी सकाळी दहा वाजता मगरीच्या सर्च ऑपरेशनला सुरुवात झाली. मगरीला पकडण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागल्या. आधी कालव्याचं पाणी कमी करण्यात आलं, तेव्हा कुठे ही मगर हाताशी आली. तब्बल बारा तासांच्या प्रयत्नांनंतर मगर जाळ्यात सापडली. या मगरीची दहशत इतकी होती, या परिसरातले शेतकरी जीव मुठीत धरुन काम करत होते. तसंच NDA च्या जवानांनी स्विमिंगचा सरावही थांबवला होता. पुण्यात दहशत माजवणारी ही मगर अखेर जाळ्यात सापडली आणि पुणेकरांचा जीव भांड्यात पडला.

[jwplayer mediaid="57005"]