www.24taas.com, पैठण
भरजरी पैठणीनं आजपर्यंत अनेक महिलांचं सौंदर्य खुलवलं. या महावस्त्राचा बाजच निराळा... आता याच पैठणीचं प्रमाणीकरणं होऊन मग ती लोकांसमोर येणार आहे.
आत्तापर्यंत या राजवस्त्रानं भल्याभल्यांना मोहिनी घातली आहे. आकर्षक रंगसंगती, मनमोहक विणकाम, अस्सल सोन्याच्या तारांनी घडवलेली पैठणी आणि त्यावर भरजरी मोर... घरंदाजपणा जपणारी, थोडासा दिमाख दाखवणारी पण सोज्ज्वळ अशी ही पैठणी... अस्सल सोन्याच्या तारांनी ती हातानं घडवली जाते. म्हणूनच तिची किंमतही थोडी जास्तच... पण सोन्या-चांदीच्या प्रमाणाचं मानक कधीच ठरत नव्हतं. म्हणूनच आता पैठणीचं प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. आणि पैठणीतल्या सोन्या चांदीच्या जरामुळे तिची किंमत निश्चित करणंही शक्य होणार आहे, असं पैठणी विकास क्लस्टरचे प्रवर्तक विक्रम गायकवाड यांनी सांगितलं.
पैठणीची किंमत सुमारे ५००० ते २ लाखापर्यंत आहे. पैठणीसाठी लागणारं दर्जेदार रेशीम आणि सोन्या चांदीची जर या गोष्टी पैठणीची मूळ किंमत ठरवत असतात. पैठणीचे काठ, पदर आणि त्यावरची कलाकुसर यावरुन तिची किंमत वाढत जाते. मात्र नवख्या ग्राहकाची फसवणूक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणूनच पैठणीच्या प्रमाणीकरणाचा फायदाच होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागही या कामासाठी मदत करणार असल्याने पैठणीला आर्थिक विश्वासार्हता मिळणार आहे. त्यामुळेच पैठणीच्या या प्रमाणीकरणानंतर पैठणी फक्त हौस म्हणून न राहता एक उत्तम प्रकारची गुंतवणूकही ठरणार आहे.