पुण्याच्या समान पाणी प्रस्ताव योजनेला अखेर मुहूर्त मिळालाय. या योजनेसाठी चार वेळा निविदा फेटाळल्यानंतर पाचव्यांदा निविदा मंजूर करण्यात आलीय. कारण निवडणुकीच्या तोंडावर तो ती मान्य करण्याचं शहाणपण महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांना सूचलंय.
पाणी वाटपातला असमतोल ही पुण्यातली गेल्या कित्येक वर्षांची समस्या आहे. शहराच्या काही भागांत २४ तास पाणीपुरवठा तर, काही भागात पाण्याचा खडखडाट अशी परिस्थिती आहे. पुण्यातल्या धरणांमध्ये पुरेसं पाणी नाही, हे कारण त्यासाठी सांगितलं जातं. पुण्यात समान पाणीपुरवठा करण्यासाठी काय करावं लागेल याच्या आराखड्याच्या निविदा आतापर्यंत चार वेळा फेटाळण्यात आल्या. पण आता पाचव्यांदा ही निविदा मंजूर करण्यात आलीय. त्यानुसार हा आराखडा मंजूर करुन तो राबवण्याचं काम इटलीतल्या कंपनीला देण्यात आलंय.
अर्थात हा केवळ सल्लागार नियुक्तीपुरता विषय आहे. प्रत्यक्षात पुण्यात चोवीस तास समान पाणीपुरवठा कधी होईल, हे सांगता येणं अशक्यच आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या विषयाला मंजुरी देऊन सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केलाय, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.