झी 24 तास वेब टीम, लंडन
"इयान बेलला वादग्रस्तरीत्या धावबाद दिल्यानंतरही त्याला पुन्हा खेळण्याची संधी देण्याचा भारतीय संघाचा निर्णय हा इतरांसाठी आदर्श ठरेल,'' अशा शब्दांत इंग्लंडचा कर्णधार अँड्य्रू स्ट्रॉस याने भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे कौतुक केले. नॉटिंगहॅम येथे झालेल्या भारत आणि इंग्लंडमधील दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी चहापानाआधीच्या शेवटच्या चेंडूवर बेलला नाट्यमयरीत्या धावबाद देण्यात आले होते; मात्र त्याला पुन्हा खेळण्याची संधी देण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला होता.
षटक पूर्ण झाल्याचा इशारा पंचांनी करण्याआधीच बेल "ड्रेसिंगरुम'च्या दिशेने जाऊ लागला होता, याच वेळी अभिनव मुकुंदने "बेल्स' उडविल्याने त्याला धावबाद देण्यात आले. यामुळे मैदानावर काही काळ तणावही निर्माण झाला होता. चहापानादरम्यान भारतीय संघाने या सर्व घटनाक्रमाचा विचार करून बेलला पुन्हा फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले होते. याविषयी स्ट्रॉस म्हणाला, "बेलविरुद्धचे अपील भारताने मागे घेतले, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. एरवी अशा घटनांमध्ये नक्की चूक कुणाची, याविषयी संभ्रम असतो. पण धोनी आणि त्याच्या संघाचे हे पाऊल क्रिकेटसाठी अभिमानाचे आहे. भविष्यात हा निर्णय एक आदर्श म्हणून पाहिला जाईल. इतर खेळाडूही खिलाडूवृत्तीची ही भावना आणखी पुढे नेतील, अशी आशा आहे.''
या संपूर्ण घटनाक्रमाविषयी इंग्लंडच्या "ड्रेसिंगरुम'मध्येही प्रचंड गोंधळ होता, असे स्ट्रॉसने सांगितले. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्यासह इतर खेळाडूंनाही काय चालू आहे, ते समजत नव्हते. त्यामुळे आम्ही पंचांकडे जाऊन या संदर्भात क्रिकेटच्या नियमांविषयी चौकशी केल्याचे स्ट्रॉसने सांगितले. तो म्हणाला, "खेळाच्या नियमांमधून पाहिल्यास, बेल बाद होता, हे स्पष्ट होते. पण आमच्या मते, तो धाव घेण्याचा प्रयत्न करत नव्हता. चहापानाची वेळ झाली म्हणून बेल मैदान सोडण्याच्या तयारीत होता. यामुळे आम्ही या अपिलाचा पुनर्विचार करण्याची विनंती भारताला केली.''
'त्या' निर्णयाचा प्रणेता कोण?
खिलाडूवृत्ती दाखवीत इयान बेलला पुन्हा खेळण्याची संधी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे सर्वत्र कौतुक होत असले, तरीही भारतीय संघाच्या या निर्णयामागील मुख्य शिल्पकार "मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर असल्याचा दावा "सन स्पोर्टस' या लंडनमधील स्थानिक वृत्तपत्राने केला आहे. रविवारी झालेल्या या घटनेनंतर संघ चहापानाला गेला असताना सचिनने याविषयी आपले मत मांडले. त्याच्या संयत बोलण्यानेच भारतीय संघ खिलाडूवृत्ती दाखविण्यासाठी प्रेरित झाला, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे. तसेच, बेलविरुद्धचे अपील मागे न घेण्यावर धोनी ठाम होता, असेही यात नमूद करण्यात आले आहे.