चेन्नईचा बंगळुरूवर रोमहर्षक विजय

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सचा पाच गडी राखून पराभव केला. बंगळुरूने दिलेल्या २०६ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना चेन्नईकडून शेवटच्या चेंडूवर चौकार लगावून रविंद्र जडेजाने विजयश्री खेचून आणला. या विजयात अल्बी मॉर्कल याच्या ७ चेंडूत २८ धावांचा महत्त्वाचा वाटा होता.

Updated: Apr 12, 2012, 09:07 PM IST

www.24taas.com, चेन्नई 

 
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सचा पाच गडी राखून पराभव केला. बंगळुरूने दिलेल्या २०६ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना चेन्नईकडून शेवटच्या चेंडूवर चौकार लगावून रविंद्र जडेजाने विजयश्री खेचून आणला. या विजयात अल्बी मॉर्कल याच्या ७ चेंडूत २८ धावांचा महत्त्वाचा वाटा होता.

 

 

चेन्नईकडून फाफ ड्यु प्लेस्सिसने ४६ चेंडूत ७१, धोनीने २४ चेंडूत ४०  धावा, सुरेश रैना २३, ब्राव्हो २५, एम विजय ११ आणि जडेजाने ४ धावा केल्या. पहिल्या डावात ख्रिस गेल(६८), विराट कोहली(५७) आणि मयांक अग्रवालच्या(४५) शानदार कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर अक्षरश: धावांचा डोंगर रचला. रॉयल चॅलेंजर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करून निर्धारित २० षटकात २०५ धावांचा विशाल डोंगर रचला. आयपीएल-५ मधील ही धावसंख्या सर्वाधिक आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सने १९७ धावा केल्या होत्या. अंतिम षटकात चॅलेंजर्स संघांचे चार गडी तंबूत परतले. बोलिंगर याने २४ धावा देऊन तीन विकेट घेतले.

 

 

सौरव तिवारी (८), राजू भटकल(०), चेतेश्वर पुजारा (०), कर्णधार विटोरी(०) हे लागोपाठ बाद झाले. यापूर्वी एबी डिव्हिलियर्सला केवळ चार धावा काढून मॉर्केलच्या चेंडूवर झेलबाद झाला. रॉयलचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल हा देखील उंच खेळण्याच्या नादात बाद झाला. जडेजाच्या चेंडूवर ब्रावोने त्याला बॉन्ड्रीवर टिपले. त्याने आपल्या संघासाठी शानदार कामगिरी केली. ख्रिसने ३५ चेंडूत ६८ धावा केल्या. त्यात सहा षटकार आणि दोन चौकारांचा समावेश आहे. त्याला विराट कोहलीची उत्कृष्ट साथ लाभली.

 

 

मयांक अग्रवाल याने ख्रिस गेलच्या मदतीने आपल्या संघाला शानदार सुरूवात करून दिली. परंतु मयांक उंच षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला.   मॉर्केलच्या चेंडूवर ब्रावो याने त्याला टिपले. मयांक याने २६ चेंडूत ४५ धावा केल्या. त्यात चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे.आयपीएल-५ मधील चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीची रॉयल चॅलेंजर्सने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.