झी २४ तास वेब टीम, सिडनी
भारतीय टीम नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सिडनीमध्ये दाखल झाली. ऑस्ट्रेलिया टूरच्या पहिल्याच टेस्टमध्ये पराभव पहावा लागल्यामुळे टीम इंडिया सिडनी टेस्ट जिंकून सीरिजमध्ये बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न करेल. तर सचिन तेंडुलकरही लकी सिडनी ग्राऊंडवर महासेंच्युरीला गवसणी घालण्यासाठी आतूर असणार आहे. पण ऑस्ट्रेलियन टीम सचिनला या दौऱ्यात हा विक्रम रचण्यापासून रोखण्यासाठी सज्ज असल्याचं ऑसी कोच मिकी आर्थर यांनी म्हटलं आहे.
सरत्या वर्षाला अलविदा करत नवीन वर्षात सुख,समृद्धी,यश लाभो अशीच मनोकामना करत प्रत्येकजण नव्या वर्षाचं स्वागत करतो आहे. आणि या नव्या वर्षाकडून अशीच अपेक्षा बाळगून आहे तो क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. आतापर्यंतच्या २२ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये, आपल्या बॅटच्या तडाख्याने अनेक दादा बॉलर्सची त्रेधा उडवणाऱ्या सचिनने खोऱ्याने रन्स काढले. त्याच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक रन हा माईल स्टोन ठरला. सचिनच्या नुसत्या मैदानावर उतरण्याने रेकॉर्डची उंची वाढते.
क्रिकेटमधील जवळपास सर्वच रेकॉर्डसची नोंद सचिनच्या नावावर आहे. आता हा मास्टर ब्लास्टर, आणखी एका रेकॉर्ड ब्रेक कामगिरीकरता सज्ज झाला आहे. आणि हा रेकॉर्ड आहे महासेंच्युरीचा. क्रिकेट इतिहासात सेंच्युरीजची सेंच्युरी करणारा एकमेव क्रिकेटर बनण्याचा बहुमान लवकरच सचिनला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध सेकंड टेस्टला सिडनीमध्ये सुरूवात होणार आहे. मेलबर्न टेस्टमध्ये जरी भारताला पराभव स्विकारावा लागला असला तरी पहिल्या इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी ठोकत, जणु काही ही तर रेकॉर्ड करण्यापुर्वीची रंगीत तालीमच होती असा इशारा सचिनने कांगारूंना दिला. सचिनला गवसलेल्या फॉर्ममुळे ऑसी गोटात चिंतेच वातावरण पसरलं आहे. त्यामुळेच त्यांनी सचिनवर मानसिक दबाव टाकण्याकरता आता वाक् युद्धाला आरंभ केला आहे. ऑस्ट्रेलियन कोच मिकी आर्थर यांनी सचिनला महासेंच्युरीकरता वाट पाहावी लागणार असल्याचं म्हटलं.
क्रिकेट इतिहासातील आख्यायिका बनलेल्या सचिनलाही आता शंभराव्या सेंच्युरीचे वेध लागले आहेत. त्यामुळे कांगारूंनी सचिनला कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला, तरी सचिन आपल्या लक्ष्यापासून यावेळी ढळणार नाही. त्याच्या लकी सिडनी ग्राऊंडवर आपल्या चाहत्यांना आनंद देण्याकरता आणि क्रिकेट इतिहासात नव्या वर्षाच्या मुहुर्तावर आणखी एक सुवर्ण अध्याय लिहिण्याकरता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कंबर कसून तयार आहे, असं म्हंटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.